औरंगाबाद : महाराष्ट्र सरकारच्या विरोधात बंड केलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे केवळ आमदारच नाही तर शिवसेनेच्या कोट्यातील जवळपास सर्वच मंत्रीही आहेत. उद्धव ठाकरेंना रोजच धक्का बसतोय. काल (रविवार) महाराष्ट्राचे आणखी एक मंत्री उदय सामंतही गुवाहाटी येथे पोहोचले असून ते आमदारांच्या असंतुष्ट छावणीत सामील झाले आहेत. सामंत आज गुजरातमधील सुरतहून गुवाहाटी येथे पोहोचले आहेत. यानंतर आता शिंदे गटात शिवसेनेचे 39 तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे 16 आमदार आहेत. दुसरीकडे मंत्र्यांचा विचार केला तर 9 मंत्री शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फक्त आदित्य ठाकरे उरले आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
न्यायालयातून सरकार आलं, न्यायालयातून सरकार जाईल. परंतु न्यायालयात प्रलंबित मराठा आरक्षणाचे काय?, असा प्रश्न विनोद पाटील यांनी उपस्थित केला आहे.
काय म्हणाले विनोद पाटील ?
“देवेंद्रजी फडणवीस व अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी करून सरकार स्थापन केले. या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा हस्तक्षेप केला व खुले मतदान घेण्याचा आदेश दिला. परिणामी तीन दिवसात सरकार कोसळलं. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाचा फायदा महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी झाला. आजही तसेच होताना दिसतंय. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. ज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब यांच्या गटाला बजावण्यात आलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि अजय चौधरी साहेब यांच्या गटनेते नियुक्तीलाही आव्हान देण्यात आलं आहे.
शिंदे यांचा दावा आहे की, उपाध्यक्ष (हंगामी अध्यक्ष) मला अपात्रतेची नोटीस देऊ शकत नाहीत. कारण मी गटनेता आहे. अजय चौधरी यांची निवड अयोग्य असून बहुमत आमच्याकडे आहे. यावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. शिंदे यांच्या बाजूने जेष्ठ विधीतज्ञ हरीश साळवे साहेब तर शिवसेनेच्या वतीने अभिषेक सिंघवी साहेब हे बाजू मांडणार आहेत.
शिंदे यांच्या नावावर गटनेते पदाबाबत शिक्कामोर्तब झालं तर व्हीप काढण्याचा अधिकार त्यांचा असेल. साहजिकच ते महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात असतील. परिणामी न्यायालयातून आलेलं सरकार न्यायालयातून जाईल,अस दिसतय.
पक्ष कुठलाही असो, सरकार व आपली खुर्ची वाचवण्यासाठी व मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. प्राणपणाने कोर्टात सुद्धा लढा देतात. मात्र हे करत असताना त्या अगोदर निवडून येण्यासाठी ज्यांची तुम्हाला मदत होते, त्या बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाला विसरून जाता. ज्या तळमळीने खुर्चीसाठी झटता त्याच्या अर्ध तरी मराठा आरक्षणासाठी न्यायालयात कष्ट कराल का?. यामध्ये एक मराठा लाख मराठा असणारे एकनाथ शिंदे साहेब विजयी झाले तर आनंदच आहे. साहेब तुम्ही विजयी व्हावेत व मराठा आरक्षणाचा तोडगा आपण काढावा यासाठी शुभेच्छा.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<