देशमुखांमुळे मलीन झालेली गृह विभागाची प्रतिमा वळसे पाटील सुधारणार? नव्या गृहमंत्र्यांसमोरील आव्हाने काय ?

dilip valase patil

पुणे – भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सुरू झाल्यानंतर गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणखी अडचणीत आले आहेत. सक्तवसुली संचालनालयानं देशमुख यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. देशमुख यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असं सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. या आरोपांचा पुरावा म्हणून परमबीर सिंग यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या व्हॉट्सअॅप संभाषणाचे पुरावेही दिले होते. या आरोपांमुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

या सर्व घडामोडी घडल्याने ठाकरे सरकारची चांगलीच नाचक्की झाली. दरम्यान, देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर खा. शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय असणारे दिलीप वळसे पाटील यांची गृहमंत्रीपदी वर्णी लागली. वळसे पाटील यांना या खात्याचा पदभार स्वीकारून फार वेळ झाला नसला तरीही त्यांनी गृहखात्याला वादापासून दूर ठेवण्याचे काम उत्तमरीत्या सुरु असल्याचे दिसून येत आहे.

देशमुख यांच्या कार्यकाळाची आणि वळसे पाटील यांच्या कार्यकाळाची तुलना करणे सध्या योग्य ठरणार नसले तरीही वळसे पाटील हे एक धोरणी, मुत्सदी आणि सारासार विचार करून बोलणारे आणि तसेच वर्तन करणारे नेते वाटतात. दुसऱ्या बाजूला देशमुख हे त्यांच्या वक्तव्यांमुळे तसेच कृतीमुळे देखील नेहमीच माध्यमांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी असायचे. कंगना रनौत, सुशांतसिंह, अर्नब गोस्वामी, पालघर हत्याकांड आदी प्रकरणात संयमाने आणि मुत्सदीपणे वागणे अपेक्षित असताना देशमुखांनी मात्र तसे वर्तन केले नाही.

देशमुख यांच्या काळात पोलीस दलावर ज्या प्रमाणात चिखलफेक झाली तेवढी चिखलफेक यापूर्वी कधीही झालेली नव्हती. यातच पुढे वाझे प्रकरण आले आणि पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला. नवे गृहमंत्री वळसे पाटील यांना आता सर्वप्रथम पोलीस दलामध्ये आत्मविश्वास वाढवून मग या विभागाची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे.

याशिवाय गृह विभागातील अंतर्गत कुरघोड्या,गटबाजी हे  सुद्धा महत्वाचे मुद्दे असून प्रशासनावर नियंत्रण नसल्याचे देशमुखांच्या काळात दिसून आले. आता वळसे पाटील यांना सर्वप्रथम आपल्या अनुभवाचा उपयोग करत प्रशासनावर आपले नियंत्रण प्रस्थापित करावे लागेल. याशिवाय आगामी काळात परमबीर सिंग यांचा बंदोबस्त कशा पद्धतीने वळसे पाटील करणार हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. वळसे पाटील यांना पवारांचे राजकारण चांगलेच ठावूक असून त्यांना राजकारणातील मोठा अनुभव देखील आहे. प्रशासनाची उत्तम जाण असलेले वळसे पाटील आता आपले राजकीय कौशल्य कशा पद्धतीने दाखवणार हे येत्या काही काळात स्पष्ट होईल.

महत्त्वाच्या बातम्या

IMP