दानवेंच्या प्रतिमेला उतरती कळा, जालन्यातून विलास औताडे इतिहास घडवणार ?

blank

संजय चव्हाण/ पुणे : जालना लोकसभा मतदारसंघातील सरळ लढत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे विलास औताडे यांच्यात होत आहे. रावसाहेब दानवे यांच्या कार्यशैलीमुळे नाराज असलेले मतदार काँग्रेसकडे वळतांना दिसत आहेत. या मतदारसंघात भोकरदन, बदनापूर, जालना, सिल्लोड, पैठण आणि फुलंब्री विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. दानवे यांना विरोध म्हणून या सहाही मतदारसंघात काँग्रेस पक्षासाठी काडरनिर्मिती होताना दिसत आहे. त्यामुळे २३ मे २०१९ ला ऐतिहासिक निकाल लागण्याची शक्यता येथून वर्तवली जात आहे. त्यामुळे लवकरच जालना लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून उदयास येईल, असेही मतदारराजा बोलताना दिसत आहे.

दानवे आणि औताडे यांच्या लढत होणार असल्यामुळे या मतदारसंघात रंगत वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर सहा मतदार संघातील मतदारांकडून प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन व राजकीय परिस्थितीवर बोलते करून सर्व्हे करण्यात आला. यात सर्वाधिक मतदारांनी काँग्रेसचे विलास औताडे यांना लोकसभेसाठीचा सर्वाधिक मजबूत उमेदवार म्हणून पसंदी दिली आहे. तर विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांच्याबदल मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. खासदार दानवे यांनी केवळ भोकरदनचाच विकास केला. रस्ते, पाणी, वीज, उद्योग, रोजगार आणि पायाभूत निर्माण करण्यात अपयशी ठरल्याची कारणे मतदार देत आहेत. तसेच गेल्या पाच वर्षात जनतेचा झालेला भ्रमनिराश, नोटबंदीचा फटका, ग्रामीण भागात नसलेल्या पायाभूत सुविधा, बुडलेले उद्योगधंदे, अनेक स्टील कंपन्यांचे स्थालांतरण, बेरोजगारी, पाण्याचा प्रश्न, शेतीला हमीभाव, कागदोपत्री कर्जमाफी, मुद्रा लोन न मिळाल्यामुळे तरुणांमध्ये नाराजी, उच्च शिक्षित असूनही गावात असलेल्या युवकांच्या रोजगाराचा प्रश्न असे अनेक मुद्दे घेऊन काँग्रेस भाजपवर हल्लाबोल करताना दिसत आहे, मात्र दानवे यांच्या चकवा या उपाधीमुळे ते ऐनवेळेला काय करतील, हे सांगता येत नसल्याचे मतही मतदारांनी नोंदवले.

भोरकदन तालुक्यात दानवे यांचा वरचष्मा

भोकरदन तालुक्यात पूत्र संतोष दानवे यांच्या विकास कामामुळे आणि खुद्द यांच्या खासदार निधीतून केलेल्या कामामुळे येथील नागरिकांमध्ये दानवे यांच्याविषयी आदराची भावना आहे. तीच भावना मतदानांमध्ये परावर्ती होण्याची शक्यता आहे. येथील ५७.०४ टक्के मतदारांना वाटते जालन्याचे पुन्हा खासदार होण्यासाठी दानवे हेच प्रबळ दावेदार आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांना ही मानणार मोठा गट या तालुक्यात आहे. त्यामुळे २४.०६ टक्के मतदारांना सांगितले की, आघाडीच्या उमेदवाराला मतदान करून लोकसभेत पाठवू. एकंदरीत या तालुक्यात खासदार दानवे यांना लीड मिळण्याची शक्यता आहे. हा तालुका होम पीच असल्याचे मतदारांनी सांगितले.

blank

बदनापूर- जालना तालुका शिवसेनेचा, मात्र मदत काँग्रेसला

बदनापूर तालुक्यात सध्या भाजप आमदार नारायण कुचे सत्ताधारी असले, तरी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने येथे बाजी मारली आहे. येथील मतदार हा नेहमीच शिवसेनेच्या बाजूने झुकलेला आहे. जालना विधानसभा मतदार संघात खूद्द खोतकर विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात मोठा गट शिवसेनेच्या बाजूने उभा आहे. शहरी भागात काँग्रेसचे काही प्रमाणात वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेत व नगरपरिषदेत शिवसेना व काँग्रेस यांच्यात मैत्री असल्यामुळे येथे आतून काँग्रेसलाच मदत करण्याचा प्रचार केला जात आहे. त्यामुळे येथून औताडे यांच्यासाठी वातावरण निर्मिती झाली आहे.

सिल्लोड काँग्रेसचा बालेकिल्ला

नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आमदार अब्दूल सत्तार यांनी एकहाती सत्ता मिळवून खासदार दानवे यांच्या इराद्यावर पाणी फेरले होते. काँग्रेसने या तालुक्यात अनेक विकास कामे केली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात येथील मतदार काँग्रेसच्या पाठीशी उभा आहे. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसला याच मतदारसंघाने आघाडी दिली होती. त्यामुळे या मतदार संघातून औताडे यांना चांगलाच फायदाच होईल, असे मतदार खासगीत सांगत आहेत.

फुलंब्री तालुक्यात टाय

विधनासभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांचा हा मतदार संघ आहे. काहीसा भाजप आणि काहीसा काँग्रेस माईंंडेड मतदार येथे राहतो. मात्र येथून भाजप पक्षालाच फायदा होईल. काँग्रेसच्या कल्याण काळे यांचा हा मतदारसंघ आहे. त्यांना मानणारा गट ही येथे मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाला येथून मदत होईल. खूद्द औताडे या मतदारसंघातून येतात त्यामुळे त्यांच्यासाठी येथून अडचणी येणार नसल्याचेही चित्र आहे. त्यामुळे या मतदार संघात समसमान मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

haribhau-bagade

पैठण तालुका काँग्रेस- राष्ट्रवादीचा

आघाडी झाल्यामुळे या मतदारसंघातून आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचा कौल येथील मतदारांनी दिला आहे. शिवसेनेचे सध्याचे आमदार संदीपान भूमरे यांना मानणार ग्रामीण भागात मोठा गट आहे. शहरी भागात शिवसेनेची काही प्रमाणात सत्ता आहे, मात्र भाजपने नेहमी आम्हाला वाईट वागणूक दिली, त्यामुळे आतून काँग्रेसला मदत करण्याचे आम्हाला आदेश आल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत. तसेच ग्रामीण भागात माजी आमदार संजय वाघचौर यांची ही चांगलीच पकड आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण क्षेत्रात गावागावत पसरलेली आहे. दानवे यांनी पैठण तालुक्यासाठी काहीच केले नसल्याची नाराजी येथील मतदारांमध्ये आहे. जायकवाडीतील आमच्या हक्काच्या पाण्यासाठी लढणाऱ्या येथील मतदारांनी दानवे यांनी आमचे नुकसान केल्याचे सांगितले आहे. आतापर्यंत आम्हाला आमच्या हक्काचे पाणी नाही मिळाले,मग त्यांना काय म्हणून मतदान करायचे असेही कार्यकर्ते आणि मतदार सांगत आहेत. त्यामुळे या मतदार संघात दानवे यांना अडचण येण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसच्या विलास औताडे यांना ९० टक्के मदत होईल, असे बोलले जात आहे. तसेच शिवसैनिक काँग्रेसलाच मदत करणार असल्याचे खासगीत सांगत आहेत.

सध्याला सहा विधानसभा मतदार संघात तीन भाजप, दोन शिवसेना आणि एक काँग्रेस आमदार आहे. गेल्या पाच वर्षात विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांच्या बेताल वक्तव्यामुळे आणि शेतकऱ्याबदलच्या अपशब्दामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे. विशेषत: सिल्लोड, फुलंब्री, पैठण, बदनापूर, जालना व अंबड तालुक्यात दानवे यांच्या विरोधात सुप्त लाट असल्याचे एकूणच दिसून आले. दानवे यांना मानणार मोठा गट काही तालुक्यात असल्या तरी लोकांमध्ये नाराजी आहे. आघाडीच्या उमेदवारांला निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. तसेच अँँन्टी इनकम्बंशीचा फटका दानवे यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे भविष्यात हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून उदयास येईल, असे मत मतदार नोंदवत आहे, मात्र दानवे हे सहजासहजी होऊ देणार नाहीत. येडीचोटी का जोर लगाकर मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी दानवे जंगजंग पछाडत आहेत.