fbpx

‘हे’ होणार कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष?

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यामुळे कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी आता कोणाकडे जाणार यावर चर्चा सुरु आहेत. मात्र आता काँग्रेस अध्यक्षपदी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची वर्णी लागू शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसंच, अध्यक्षपदासाठी प्रियांका गांधींचाही विचार करण्यात येऊ नये अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. तर कॉंग्रेस पक्षाला गांधी घराण्या व्यतिरिक्त दुसऱ्या अध्यक्षाची गरज आहे, असे राहुल गांधी यांनी म्हंटले होते. त्यामुळे आता अशोक गेहलोत यांना हे पद देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान अशोक गेहलोत हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असून ते सध्या राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत. गेहलोत यांचे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. शिवाय, काँग्रेसमधील बहुतेक सर्व नेत्यांचं व कार्यकर्त्यांचं त्यांच्याबद्दल चांगलं मत आहे. अशोक गेहलोत यांनी तीनदा राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे तर पाचवेळा ते खासदार राहिले आहेत. राजकारणाचा आणि संघटनात्मक कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे कॉंग्रेसकडून अशोक गेहलोत यांचे नाव अध्यक्ष पदासाठी चर्चेत असल्याचं कळत आहे.