पक्षांतराचा इतिहास असलेल्या नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष करण्याचे धाडस पक्ष श्रेष्ठी करणार का ?

nana

नागपूर : राजधानी दिल्लीमध्ये बुधवारी दिवसभर महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची जोरदार चर्चा होती. विधानसभाा अध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेस हायकमांडने तडकाफडकी रात्री उशिरा दिल्लीत बोलावून घेतलं होतं. नाना पटोले हे दिल्लीत आल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी पटोले यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला म्हणून आपण राजीनामा देत आहोत, असं पटोलेंचं त्यावेळी म्हणणं होतं.तत्पूर्वी,नाना पटोले यांनी 2008 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. सन 2014 मध्ये त्यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांचा भंडारा मतदारसंघात पराभव केला होता.

दरम्यान, एका हिवाळी अधिवेशनात खासदारांच्या बैठकीत नानांनी शेतकऱ्यांच्या आणि ओबीसींच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नावरून मोदी रागावले आणि त्यांनी पटोले यांना खाली बसण्याचा इशारा केला. त्याच वेळी त्यांच्याबाबत माझा भ्रमनिरास झाला असे त्यांनी माध्यमांना सांगितले होते यानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली.

सद्यस्थिती पाहता नैराश्येच्या गर्तेत सापडलेल्या कॉंग्रेसला नवसंजीवनी देण्याची ताकत पटोले यांच्यात आहे. विदर्भाचे प्रतिनिधित्व करणारे पटोले हे अतिशय आक्रमक स्वभावाचे नेते आहेत.ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक असतात.शेतकऱ्यांच्या समस्यांची नेमकी जाण त्यांना आहे.उत्तम वक्तृत्व,सुसंस्कृतपणा,राजकीय अनुभव याशिवाय सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे चांगले संबंध या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.

दुसऱ्या बाजूला जुने दिग्गज नेते अध्यक्षपदावर डोळा ठेवून आहेत. नानांचा तापट स्वभाव आणि मागे केलेले पक्षांतर या त्यांच्या अध्यक्षपदासाठी अडचणीच्या ठरणाऱ्या गोष्टी आहेत.नाना भाजपमधून कॉंग्रेसमध्ये आले आहेत आणि अश्या पक्षांतर करून आलेल्या व्यक्तीच्या हातात महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा देण्याचे धाडस कॉंग्रेस श्रेष्ठी करणार का हे लवकरच स्पष्ट होईल.

महत्वाच्या बातम्या