क्रिकेटचा देव बनणार गणेश उत्सवाचा ब्रँड अँबेसिडर ?

पुणे: क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर आता गणेश उत्सवाचा ब्रँड अँबेसिडर होऊ शकतो. यंदाच्या वर्षी सार्वजनिक गणेश उत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे या उत्सवाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने गणेश उत्सवाचा ब्रॅण्ड अँबेसिडर म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची निवड करण्याची चर्चा महापालिका गटनेत्यांच्या बैठकीत करण्यात आली असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिलीय.

पुणे महापालिकेत गणेश उत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त आज महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, शिवसेना गट नेते संजय भोसले यांच्या उपस्थिती मध्ये बैठक पार पडली.

यावेळी महापौर टिळक म्हणाल्या की, दरवर्षी प्रमाणे यंदा देखील शहरातील गणेश उत्सव उत्साहात पार पडणार असून त्या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून  विशेष नियोजन करण्यात येत आहे. या गणेशोत्सवासाठी महापालिकेच्या वतीने 2 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.  25 ऑगस्टला गणेशोत्सव सुरु होणार आहे.मात्र, त्यापूर्वी महिनाभर अगोदर शहरातील विविध भागात कार्यक्रम घेतले जाणार आहेत. या कार्यक्रमाची रुपरेषा 11 जुलैला घेण्यात येणाऱ्या पुढील बैठकीत निश्चित केले जाणार आहे. यंदा गणेशोत्सवासाठी महापालिकेच्या वतीने विशेष बोधचिन्ह तयार करण्यात येणार आहे.