fbpx

शिवरायांच्या पुतळ्याच्या उंचीत कपात, मात्र तरीही जगातील सर्वात उंच स्मारक ठरणार

मुंबई : मुंबईच्या अरबी समुद्रात उभारलं जाणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे जगातील सर्वात उंच स्मारक असेल, अशी घोषणा सरकारने केली आहे पण ती आपल्याला ‘महागात’ पडत असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी भारीच शक्कल लढवल्याचं समोर आलं आहे. खर्चामुळे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करावी लागेल, असा निर्णय सरकारला नाईलाजाने घ्यावा लागला. पण, महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीत कपात करावी लागली म्हणून काय झालं, तलवारीची पात अधिक उंच करू या आणि स्मारकाची उंची ठरलीय तेवढीच ठेवू या, असा तोडगा सरकारने शोधून काढला आहे अशी माहिती अधिकारातून समोर आली आहे.

इंडियन एक्स्पेसने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मिळवलेल्या कागदपत्रांनुसार, राज्य सरकारच्या प्रस्तावित आराखड्यानुसार पुतळ्याची उंची एकूण १२१.२ मीटर होती. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची उंची ८३.२ मीटर आणि तलवारीची उंची ३८ मीटर होती.मात्र यावर्षी राज्य सरकारने बांधकाम खर्चात कपात कऱण्यासाठी पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुतळ्याची उंची ८३.२ ऐवजी कमी करुन ७५.७ मीटर करण्यात येणार असून तलवारीची उंची ३८ मीटर ऐवजी ४५.५ मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुतळ्याची एकूण उंची कमी होणार नसून १२१.२ मीटरच राहणार आहे. स्मारकाची एकूण उंची २१० मीटर असणार आहे.

राज्य सरकारच्या नवीन प्रस्तावित आराखड्यामुळे शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा खर्च 338.94 कोटी रुपयांनी कमी झाला आहे. राज्य सरकारने एल अँड टी कंपनीला या पुतळ्याचे कंत्राट दिले. त्यानंतर, विरोधकांनी सरकारवर टीका करताना, पुतळ्याची उंची कमी करून चौथऱ्याची उंची वाढविल्याचा आरोप केला होता. पण, राज्य सरकारने हे आरोप फेटाळत पुतळ्याची उंची 121.2 मीटर एवढीच राहिल, असे सांगितले होते.

हे स्मारक तीन वर्षांत पूर्ण करण्यात येणार असून या स्मारकासाठी राजभवनापासून १.२ किलोमीटर आणि गिरगाव चौपाटीपासून ३.६ किलोमीटर तर नरिमन पॉंइंट पासून २.६ किलोमीटर अंतरावर असलेली जागा निश्चित करण्यात आली आहे .

शिवस्मारक बांधतोय म्हणून विरोधकांच्या पोटात दुखतंय; विनोद तावडे आक्रमक!

छत्रपती शिवरायांच्या अस्थींची डीएनए चाचणी करण्याची इतिहासकाराची मागणी