१८ जानेवारी पासून मुंबईसह ठाण्यातील शाळा सुरु होणार ?

shala

मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानंतर राज्यभरात शाळा सुरु करण्यासाठी लगबग सुरु झाली होती. राज्य सरकारकडून कडक नियमावली जाहीर करण्यात आली होती.

मात्र, दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसत असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता मुंबई, पुण्यासह नाशिक, पिंपरी-चिंचवड व अन्य काही शहरातील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई, ठाणे वगळता उर्वरित राज्यातील ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.

ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनचा धोका लक्षात घेता मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा-महाविद्यालये 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. आता राज्यातील कोरोनाचा धोका हा कमी झाला असून १६ जानेवारी पासून देशभरात लसीकरणाला देखील सुरुवात होणार आहे.

धोका कमी झाल्याने आता मुंबई, ठाण्यातील देखील शाळा सुरु होण्याची शक्यता आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांची स्वच्छता, निर्जंतुकीकरणाची कामे हाती घेतली आहेत. यात अलगीकरण कक्षासाठी वापरल्या गेलेल्या शाळांच्या र्निजतुकीकरणावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर पालिका शाळांना साबण, थर्मामिटर, ऑक्सिजन मीटर देखील पुरवण्यात येणार आहे.

दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा देखील येत्या आठवड्याभरात जाहीर होऊ शकतात. त्यामुळेच आता 18 जानेवारी म्हणजेच सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पालिकेच्या शिक्षण विभागाने पाठवला आहे. आयुक्तांनी मंजुरी दिल्यास मुंबई, ठाण्यातील शाळांमध्ये 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरु होतील. शाळांमध्ये तशी लगबग देखील सुरु झाली आहे.

महत्वाच्या बातम्या