हितगुज : सलून व्यावसायिक संकटातील संधी शोधतील का?

प्रो. डॉ. नानासाहेब गोरे : कोरोना विषानुने संपूर्ण जगामध्ये अक्षरशः धुमाकुळ घातला आहे. या महामारीतून मुक्त होण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न शासन स्तरावरुन केले जात आहेत. कोरोना योध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता या विरुद्ध निकराची झुंज देत आहेत. यांंना सर्वप्रथम त्रिवार वंदन. काही अतिउत्साही लोक सोडले तर शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन सर्व भारतीय करत असल्यामुळेच इतर प्रगत देशांच्या तुलनेत भारताची स्थिति आजतरी पूर्णतः नियंत्रित आहे.

लॉकडाउन घोषित झाल्यापासून आपले राष्ट्रीय व नैतिक कर्तव्य समजून सलून व्यावसायिकानी आपला नियमित खर्च, दुकान भाडे, वीजबिल, कर्ज देणी यांची कसलीचं पर्वा न करता आपापली दुकाने बंद ठेऊन या राष्ट्रीय कार्यामध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला ही खरच कौतुकाची बाब आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. वैयक्तिक संकटांपेक्षा राष्ट्रीय संकटाशी झुंज देण हे आपल आद्य कर्तव्य आहे. याचा सुज्ञपना आपल्याजवळ असल्याचा सार्थ अभिमान आम्हास आहे. यावरही दोनचार जनानी नियम मोडून, वेगवेगळी शक्कल लढवून, शटर बंद करुण आपला व्यवसाय सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांंना कायद्याचा बडगा दाखवून प्रशासनाने व्यवसाय बंद करण्यास भाग पाडले. प्रशासनाच्या या न्याय कृतीचे सर्व सलून व्यवसायिक संघटना व नाभिक शिखर संघटनानी स्वागतच केले.

यावर ही काही लोक आपली वैक्तिक जवळीकता, व्यक्तिगत संबंध, वेळ प्रसंगी केलेल्या मदतीची जाणीव करुण देत तर कधी पद, प्रतिष्ठा यांचा धाक दाखवून कारागिरांंना घरी बोलावून आपली कटिंग, दाढी करुण घेण्याचे उपक्रम करू लागले. ही बाब संघटनांच्या लक्षात येताच त्यांंनी अशाप्रकारे चोरुन काम करणाऱ्यांंना महामारीची भयानकता लक्षात आणून देऊन त्यांचे मन परिवर्तीत केले व विविध समाजमाध्यमांद्वारे अशी कामे न करण्याचे आवाहन केले व प्रसंगी इशारेही दिले. परिणामतः संघटनात्मक कृतीला मोठे यश प्राप्त झाले ही बाब नोंद घेण्यासारखी आहे.

तरीसुध्दा समाजमध्यमावरुन सर्वात जास्त टिका आणि टिंगल – टवाळकी कोणत्या व्यवसायावर झाली असेल तर तो म्हणजे सलून व्यवसाय आणि व्यवसायिक. काही-काही जणांंनी तर कळसच गाठला कोरोना विषाणूच्या संसर्गाकरीता सलून व्यावसायिकच जवाबदार आहेत, अशा प्रकारचे चुकीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कोरोना संदर्भात कोणतीही चुकीची माहिती पसरवू नये तसेच कोणत्याही एक जात, समुदाय, व्यावसायिक यांची बदनामी होईल व जातीय तेढ निर्माण होईल असे संदेश पसरवू नयेत असे प्रशासनाचे आदेश असुनसुद्धा काही हौशे – नौशे – गौशे मुद्दामहुन सलून व्यवसाय व व्यावसायिकांविषयी चुकीचे संदेश स्वैर व सराईतपणे पसरवत आहेत ही बाब लपुन राहिलेली नाही.

परंतु या संकटाच्या घडीमध्ये वेळ संघर्षाची नाही तर विधायक चिंतनाची आहे. आपण जातिद्वेषभावनेतून फिरत असलेल्या या संदेशांचे मूल्यांकन केले पाहिजे. यातील काही संदेश निव्वळ टिंगल टवाळकीच्या भावनेतून तयार केले गेले आहेत. तर काही खरच आत्मचिंतन करण्यास भाग पडणारे आहेत.

सलून व्यावसायिकांचा स्वच्छतेचा मुद्दा नेहमीच ऐरणीवरचा विषय राहिलेला आहे. यामध्ये व्यावसायाकरिता लागणारे साहित्य, वस्त्र इत्यादिचा समावेश आहे. बदललेल्या जीवन शैलीमुळे एकंदरितच सर्वांची रोगप्रतिकार शक्ति कमी झालेली आहे. ही बाब लक्षात घेऊन मेडिकल सायन्सने इंजेक्शन सारखी सरळ शरीरात प्रवेश करणारी उपकरणे यूज एंड थ्रो स्वरुपाची बनवली. तसेच जेथे हे शक्य नाही त्यांच्या निरजंतुकीकरणावर अधिक लक्ष्य केंद्रित केले आणि यासाठी लागणारा सर्व खर्च पेशेंट कडून वसूल करण्यास सुरुवात केली.

सलून व्यवसाय हा सुद्धा संपूर्णत: मानवी शरीराशी निगडित असल्यामुळे काही व्यावसायिक यासंबंधी सुरुवातीपासुनच पूर्णपणे जागृत आहेत व त्यांंनी या गोष्टीकडे सुरुवाती पासुनचं लक्ष केंद्रित केले आहे. परंतु त्यांची संख्या अत्यल्प आहे. आता आपणास सर्वार्थाने जागृत होऊन व्यवसाय करने गरजेचे आहे. आपण वापरत असलेल्या साहित्यांंचे निरजंतुकीकरणाच्या प्रक्रियेचे ज्ञान संपादन करुण तसेच आपण जी वस्त्रे दिवसभर कोणतेही निरजंतुकीकरण न करता प्रत्येक ग्राहकाकरिता एकच वापरतो ते बंद करुण क्विक क्लीनिंग किंवा यूज एंड थ्रो सारखे काही पर्याय शोधता येतील का हे पाहणे गरजेचे आहे.

काही जणांंना निश्चितच प्रश्न पडला असेल की सलूनच्या एवढ्या अल्प दरामध्ये या सर्व गोष्टी शक्य तरी आहेत का? मला माहित आहे. आजच्या महागाईच्या जमान्यामध्ये सर्वात स्वस्ताईत कशात असेल तर ती म्हणजे सलून व्यवसायामध्ये. आपल सर्व कौशल्य पनाला लाऊन दाढी करणारा करागिराच्या दाढीची रक्कम एका कैडबरी चॉकलेटच्या किंमती एवढी सुद्धा नसते. त्याच मुख्य कारण म्हणजे आपली आपापसातील स्पर्धा व सेवा दरातील मनमर्जीपणा. म्हणूनच आपला कारागिर पिढ्या न पिढ्या व्यावसाय करुण ही बाजारामध्ये दुकान खरेदी करण्या इतपत सुद्धा कमाई करू शकत नाही.

आजच्या जागतिकीकरणाच्या विश्वस्पर्धेमध्ये इतर वस्तु व सेवांचे दर पाहिले तर भर दिवसा भोवळ आल्याशिवाय रहात नाही. म्हणूनच त्यांंनी व्यावसाय सुरु केला न केला की लगेच त्यांच जीवनमान राहनीमान उंचाउन जात. स्वतःच दुकान, बंगला. गाडी अशा उच्चभ्रू सुविधा उपभोगतात. आणि सलून व्यावसायिक मात्र आयुष्यभर दुकान आणि घराचे भाडे भरूनच मेटाकुटिला येतो.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या संकटात सुध्दा संधी शोधा अस आव्हान परत – परत करत आहेत. नाभिक संघटनांचे नेते व्यावसायिक पद्धतिमध्ये अमूलाग्र बदल करण्यासाठी पोटतिडकीने मार्गदर्शन करत आहेत. आता ही वेळ खरोखरच आत्मभानान परिवर्तनाची आहे. म्हणून आपण आता जागृत होऊन व्यावसायिक परिवर्तन करुण या संकटातील संधी शोधन गराजेच आहे.

पूर्वी आपला सेवा उद्योग बलुतेदारीच्या जोखडामध्ये आडकलेला होता. आपणास फक्त सेवेचाच अधिकार होता. त्याचा मोबादला ठरवण्याचा  अधिकार नव्हता. म्हणून देणारे त्यांच्या कुवती व वृत्तिनुसार मोबादला देत असत. कमी वाटल आणि प्रत्यक्षात असला तरी ते मागन्याचा आणि त्याबाबतीत आग्रह धरन्याचा किंवा कुठे तक्रार करण्याचा अधिकार सलून व्यावसायिकाना नव्हता.

परंतु आता प्रत्येक वस्तु निर्माता व सेवा प्रदाता आपल्या वस्तुची व सेवेची किंमत ठरऊ शकतो. म्हणून आपण कोरोनानंतर आपल्या व्यावसायामध्ये जे सकारात्मक बदल करणार आहात त्याचे सेवा दर आपण ग्राहकाकडून घेऊन त्यांंना उत्तम सेवा देऊ शकता.
आज कोरोनामुळे प्रत्येक व्यक्ति आपल्या आरोग्याविषयी जागृत झाला आहे. त्याला पैशापेक्षा ही आपला जीव, आपल आरोग्य महत्वाच वाटू लागल आहे. म्हणून आरोग्यविषयक दृष्टिकोनातून तुम्ही जे बदल करणार आहात व त्याचे दर ठरवणार आहत त्याचे तो स्वागतच करणार आहे. काही वादही घालतील तेव्हां तुम्ही केलेल्या सुधारणाची माहिती नम्रपणे करुण द्या तेही नक्की स्वीकारतीलच.

वाढत्या शहरीकरणाचा नेमका फायदा घेत आपण बलुतेदारी पद्धतीमध्ये बदल करत दुकानदारी सुरु केली. आता या संकटामध्ये संधी शोधत आपणास आपल्या व्यवसायाचे अत्याधुनिकीकरण करावयाचे आहे. यामुळे आपला व्यावसायिक दर्जा उंचावण्यास नक्कीच मदत होणार आहे.

हे कार्य कोणा एकाचे नसून याकरीता सामूहिक समन्वय व कृतिची गरज आहे. त्यामुळे आता आपण आपल्या जवळ उपलब्ध साधनांचा वापर करुण एकमेकांशी संवाद स्थापित करुण व्यवसायाची दिशा निश्चित करने गरजेचे आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी समन्वयाची भूमिका बजावत आपल्या भागाची गरज, जीवन शैली इत्यादिचा अभ्यास करुण एक समन्वित व्यावसायायिक पद्धति व प्रक्रियेचा आराखडा तयार करावा जेणेकरून ते सर्वांकरिता सोइस्कर व बंधनकारक होईल.