मराठा आरक्षण आंदोलन : पाच लाखांच्या खालील नुकसानीचे गुन्हे मागे घेणार : पाटील

टीम महाराष्ट्र देशा :राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील पाच लाखांच्या खालील नुकसानीचे गुन्हे मागे घेणार असल्याची माहिती दिली आहे. त्यासंदर्भातील सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाने आंदोलन केले होते. या आंदोलनात काही ठिकाणी हिंसाचारात आर्थिक नुकसान झाले होते. यातील दोषींवर गुन्हे दाखल झाले होते. हे गुन्हे मागे घेण्याविषयी पाटील यांनी आंदोलनाबाबत ज्यांच्यावर पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्रक्रिया सुरू केली आहे.

तसेच ज्या आंदोलनात पाच लाखांपेक्षा कमी नुकसान आहे, अशा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या समन्वयातून गुन्ह्याचे तपशील समजून घेतले जातील, असे तपशील जिल्हास्तरावरून राज्य सरकारकडे पाठविले जातील. त्यासाठी राज्य शासनाने अर्थमंत्री सुधीर मनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडेही प्रकरणे पाठविली जातील. हे गुन्हे तपशील पाहून मागे घेतले जातील असही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत