नारायण राणे स्वतःचा पक्ष सोडणार का ? राणे म्हणतात…

टीम महाराष्ट्र देशा- स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांच्या कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या बातम्या प्रसारित करण्याचा माध्यमांनी सकाळपासून धडाका लावला होता. मात्र आता दस्तुरखुद्द नारायण राणे यांनीच यावर भाष्य केले आहे. मी काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. माझ्या काँग्रेस प्रवेशाबाबतच्या विनाकारण चर्चा होत असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले आहे. आज एनडीएच्या घटकपक्षांची दिल्लीत बैठक आहे. या बैठकीसाठी आपण दिल्लीत आल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला. लोकसभा निवडणुकीत मुलगा निलेश राणेचा पराभव झाल्यामुळे निराश असलेले नारायण राणे हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे वृत्त काही वृत्त वाहिन्यांवर आले होते. राणे पुढे म्हणाले की, मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निमंत्रण होते. त्यामुळे मी त्यांनी भेटायला महाराष्ट्र सदनात आलो. मुख्यमंत्र्यांच्या सदनातील टीव्हीवर आम्हाला राणे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची बातमी दिसली. या वृत्तात कोणतेही तथ्य नाही.

दरम्यान, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंच्या कॉंग्रेस प्रवेशावर ‘बुडत्या नावेत कोण जाईल, अशी मार्मिक टिपणी करत कॉंग्रेसला टोला लगावला आहे.या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही त्यामुळे राणे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून कॉंग्रेसची होणारी वाताहात थांबवतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरु आहे.