fbpx

संजय निरुपमांचा प्रचार राज ठाकरे करणार का? मनसेने जाहीर केली अधिकृत भूमिका

टीम महाराष्ट्र देशा- मराठी द्वेष करणाऱ्या व महाराष्ट्र विरोधात भूमिका घेणाऱ्या संजय निरूपमला आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे कोणत्याही प्रकारे मदत करणार नाही, अशी रोकठोक भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे . मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेची भुमिका स्पष्ट केली असून इतर ठिकाणी मात्र मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन केले जाईल असे संकेत नांदगावकर यांनी दिले आहेत.

काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘लुख्खा’ या भाषेत हिणवले त्याच काँग्रेसला आणि निरुपम यांना मतदान करण्याची वेळ आज मनसेच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. हा खरंच मनसेच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार आहे, अशी खरमरीत टिका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली होती. यानंतर संजय निरुपमचा प्रचार मनसे करणार का? हा सवाल वारंवार उपस्थित होऊ लागला होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सोशल मिडीयात राज यांच्यावर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. प्रश्नांच्या चक्रव्यूहातून मनसेला बाहेर काढण्यासाठी अखेर नांदगावकर धावले. नांदगावकरांनी संजय निरुपम यांना कोणत्याही प्रकारे मदत करण्याची मनसेची भूमिका नाही हे स्पष्ट केले. निरुपम यांचा प्रचार करणार नाही हीच पक्षाची अधिकृत भूमिका आहे. तशा सूचना मनसेच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. निरुपम यांच्या मतदारसंघातील आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुंबईतील इतर मतदारसंघात फिरतील असं नांदगावकरांनी स्पष्ट केलं आहे.