मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्यावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना अटकही करण्यात आली होती. आता ११ दिवसानंतर राणा दाम्पत्याला जामीन मिळाला. आता नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा महाआरती करण्याचे जाहीर केले आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरुन निवडणूक लढतील काय? हा माझा त्यांना सवाल आहे. मुख्यमंत्र्यांनी १४ तारखेच्या मुंबईच्या सभेत माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. ते जर निवडणूक लढणार असतील तर कोणत्या मतदारसंघातून लढणार, याचंही उत्तर त्यांनी द्यावं. ज्यांनी आपली विचारधारा सोडलेली आहे, अशा उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सभेदिवशी मी दिल्लीत असणार आहे. १४ तारखेला सकाळीच आम्ही दिल्लीतील कॅनोट प्लेसला संकट मोचन हनुमान मंदिरात जाऊन आम्ही आरती करणार आहोत. हे संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे, ते दूर झालं पाहिजे, अशी मागणी आम्ही हनुमानाचरणी करणार आहोत”, असे नवनीत राणा म्हणाल्या.
“बाळासाहेबांनी मृत्यूपर्यंत एकही निवडणूक लढली नाही. त्यांना पदाची लालसा नव्हती. तर तुम्हाला पदाची लालसा आहे तर तुम्ही निवडणूक लढा. हे मात्र नक्की की मी तुमच्याविरोधात निवडणूक लढणार, फक्त १४ तारखेच्या सभेत कोणत्या मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढणार हे स्पष्ट करा,” असेही आव्हान नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
महत्वाच्या बातम्या