कांद्याचे दर वाढले म्हणून मोदी काय कांदा उगवतील का? : बाबा रामदेव

टीम महाराष्ट्र देशा : आपण देशातील समस्यांवर भाष्य करतो, मात्र समोर असलेल्या आव्हानांवर मात करत नाही. समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत नाही. देशात आर्थिक मंदी आहे, बेरोजगारी आहे, गरिबी आहे, हे सर्व खर आहे. मात्र आपण त्या समस्या सोडवण्यासाठी काय करतोय हे देखील पाहिले पाहिजे, असे म्हणत योगगुरु बाबा रामदेव यांनी आज अहमदनगर येथील कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

संगमनेर येथे बाबा रामदेव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत गीता परिवाराच्यावतीने गीता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 30 हजार विद्यार्थ्यांनी भगवतगीतेच्या 12 ते 15 व्या अध्यायांचे सामूहिक पठण केले.

यावेळी बाबा रामदेव म्हणाले की, आपण समस्या मोजत बसण्यापेक्षा या समस्येचं निराकरण कसं करता येईल यावर लक्ष केंद्रित करा. त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा, तसा संकल्प करा. एकटे मोदी काय करतील? कांद्याचे दर वाढले म्हणून मोदी काय कांदा उगावतील का? दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण स्वत: कीर्तिमान बना, असेही बाबा रामदेव म्हणाले.

तर आपल्या कर्माने, पुरुषार्थाने आपलं आणि इतरांचं भाग्य घडवणारे आपल्याला बनायचं आहे. केवळ दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये. दुसऱ्यांवर अवलंबून असतात ते दरिद्री, कंगाल असतात. आपण समस्या मोजणारे बनू नये, आपण आयुष्यात असं काही करावं, की सर्व समस्यांचं निराकरण करुन, नवा कीर्तिमान उभा करावा, असा संकल्प मुलांनी करावा, असे बाबा रामदेव म्हणाले.

महत्वाच्या  बातम्या