मिताली राज आणि झूलन गोस्वामी इतिहास रचणार का ?

भारतीय प्रेक्षकांच्या नजरा आजच्या एतिहासिक सामन्यावर

वेबटीम: भारतीय महिला क्रिकेट संघाचा विषय निघाला की सर्वांना हरमनप्रीत कौर आणि तिची धमाकेदार फलंदाजी हे प्रथम आठवतं. पण या सामन्याआधी जेव्हाही महिला क्रिकेट विषयी चर्चा झाली आहे ती झुलन गोस्वामी आणि मिताली राज शिवाय अपूर्ण राहिली आहे.

मितालीने १९९९ आणि झूलनने २००२ या वर्षात भारताच्या एकदिवसीय संघात पदार्पण केले. तेव्हापासून आज पर्यंत या दोघीही सातत्याने भारतीय संघाचा अविभाज्य भाग राहिल्या आहेत. मिताली राज महिला एकदिवसीय क्रिकेट मध्ये ६००० हून अधिक धावा करणारी एकमेव ठरली तर झूलन गोस्वामी १९२ बळींसह सर्वाधिक बळी घेणारी एकमेव महिला ठरली. गेली अनेक वर्ष विश्वचषकाचे स्वप्न उराशी बाळगून या दोघी संघात ठाम राहिल्या आहेत आणि तेही आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत. २००५ साली भारतीय महिला संघ प्रथमच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोचला होता, मात्र ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघापुढे तग न धरू शकल्यामुळे तो सामना भारताला गमवावा लागला होता. तेव्हा आणि आजच्या संघात एक समान धागा म्हणजे झूलन गोस्वामी आणि मिताली राज, या दोघी त्या संघात होत्या आणि मिताली संघाची तेव्हाही कर्णधार होती. बदल एवढाच की यावेळी संघ मजबूत आहे चांगल्या लयीत आहे आणि उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियालाच पराभूत करून अंतिम सामन्यात मजल मारली आहे.

या सर्व गोष्टी लक्षात घेता आणि मिताली आणि झूलन यांनी भारतीय क्रिकेटला दिलेल्या अविस्मरणीय आठवणींना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी हा विश्वचषक जिंकणं महत्वाचं ठरेल. मिताली आणि झूलन यांच्या या अद्भुत कारकिर्दीला एका विश्वचषकाची जोड मिळाली तर याहून अधिक काही नसेल हे मात्र नक्की.

 

You might also like
Comments
Loading...