पुण्यात पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यात येणार का ? आयुक्त म्हणतात…

shekhar gaikwad

पुणे – कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्याने रुग्णवाढ होत आहे. 31 जुलै पर्यंत कोरोनाचे 40 हजार रुग्ण होणार आहेत. त्या प्रमाणात बेडस, आयसीयू, व्हेंटिलेटर, आशा आरोग्य सोयीसुविधा उभारण्यावर पुणे महापालिका प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सध्या तरी आणखी लॉकडाऊन वाढविण्यात येणार नसल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

कोरोनाचा आढावा घेण्यासाठी दर आठवड्याला बैठक होत असते. मुंबई सारखी परिस्थिती पुण्यात नाही. त्या त्या वेळची परिस्थिती बघून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. महापालिका प्रशासनातर्फे खाजगी हॉस्पिटलच्या ८० टक्के खाटा कोरोना उपचारासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी होते की नाही, याची पाहणी करण्यासाठी शहरातील प्रत्येक मोठ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये महापालिकेच्या एका प्रतिनिधीची (कॉरडिनेटर) ची नियुक्ती करण्यात येणार आहे.

शहरातील खाजगी हॉस्पिटलमधील काही बेड महापालिकेने करार करून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपलब्ध करून दिले होते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत खाजगी हॉस्पिटलमधील बेडही आरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने शहरातील मोठ्या हॉस्पिटलला आदेश देऊन सर्वसाधारण बेड, आयसीयु बेड, व्हेंटिलेटर बेड व आॅक्सिजन बेड कोविड-१९ रूग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे खाजगी हॉस्पिटलकडून विभागीय आयुक्त कार्यालयाने तयार केलेल्या डॅशबोर्डवर दररोज उपलब्ध खाटांची माहिती दर्शविली जाते.

दरम्यान,पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करून आढळणाऱ्या रुग्णांवर वेळीच उपचारासाठी करण्यासाठी पुणे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्र शासन आणि राज्य शासनातर्फे मदत केली जात आहे. पीएम केअर फंड ट्रस्टकडून आतापर्यंत 21 व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. भविष्यात आणखी व्हेंटिलेटर प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

डॉ. नायडु आणि ससून रुग्णालयात हे व्हेंटिलेटर बसविण्यात आले आहेत. पुणे शहरात रोज 500 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी तर तब्बल 877 रुग्ण आढळले. सध्या रोज कोरोनाच्या 4 हजारांच्या वर चाचण्या करण्यात येत आहेत. भविष्यात आयसीयू आणि व्हेंटिलेटर कमी पडण्याची शक्यता महापालिकेतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. मागील 2 दिवसांपासून 800 च्या वर कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तब्बल 4 हजारांच्या वर कोरोना चाचण्या करण्यात येत असल्याने रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. कोरोनामुळे मृत्यू कमी झाले आहेत. मात्र, तरीही नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. विशेषतः जेष्ठ नागरिकांनी अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे.

मंत्र्यांच्या गाड्यांवर सरकारची उधळपट्टी; निलेश राणेंनी डागली तोफ

कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे नाहीत मात्र मंत्र्यांसाठी 6 नव्या गाड्या खरेदीसाठी आहेत ?

अक्षय कुमारचा नाशिक दौरा वादात, भुजबळांनी दिले चौकशीचे आदेश