fbpx

… तर मोदी दिल्लीत विजय चौकात स्वतः फाशी घेणार का ? कॉंग्रेस नेत्याचा वादग्रस्त सवाल

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवणुकीच्या प्रचारात कॉंग्रेसला ४० जागांपेक्षा कमी जागा मिळतील असे वारंवार म्हणत आले आहेत. त्यांच्या याचं वाक्याचा काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी चांगलाच संचार घेतला आहे. मात्र, पंतप्रधानांवर टीका करताना खर्गेंचा तोल गेला आहे. जर काँग्रेसला ४० पेक्षा जास्त जागा मिळाल्या, तर नरेंद्र मोदी दिल्लीत विजय चौकात स्वतः फाशी घेणार का, असा वादग्रस्त प्रश्न खर्गे यांनी विचारला. कर्नाटकमधील एका जाहीर सभेत खर्गे यांनी हा वादग्रस्त प्रश्न विचारला.

कर्नाटकमधील चिंचोली विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार सुभाष राठोड यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी खर्गे म्हणाले, इथे बसलेले लोकच या देशाचे भविष्य आणि नशीब ठरवणार आहेत. सुभाष राठोड आणि काँग्रेस पक्ष यांचे भविष्य ठरविणेही तुमच्या हातात आहे. त्यांच्या हातात नाही. नरेंद्र मोदी सध्या जिथे कुठे जातात, तिथे काँग्रेसला ४० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असे सांगतात. तुमच्यापैकी कोणीही यावर सहमत आहात का?, जर आम्हाला ४० पेक्षा जास्त जागा मिळाल्या, तर नरेंद्र मोदी स्वतःला विजय चौकामध्ये फाशी लावून घेणार का? असा प्रश्न त्यांनी विचारला.

मोदी जरी ते मागासवर्गातून आले आहेत, असे सांगत असले, तरी ते केवळ श्रीमंतांसाठीच काम करत आहेत, असा आरोप खर्गे यांनी केला. देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा मोदींचा जन्मही झाला नव्हता, असेही खर्गे म्हणाले.