एकनाथ खडसे भाजप सोडणार का? पंकजा मुंडे म्हणतात…

pankaja munde

बीड : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना सोयीस्करपणे राजकारणातुन डावलण्यात आल्याचे आरोप खुद्द त्यांनीच काही भाजप नेत्यांवर लावले होते. यानंतर अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेल्या नाराजीची खदखद त्यांनी माध्यमांमध्ये व्यक्त केली होती. मात्र, भाजप पक्षाला अडचणीच्या काळात उभारी देणाऱ्या नेत्यांपैकी एक असल्याने पुन्हा सक्रिय होण्याची संधी मिळेल या आशेवर एकनाथ खडसे अजूनही भाजपमध्येच आहेत.

खडसे राष्ट्रवादीत यावे यासाठी राष्ट्रवादी पायघड्या घालत आहे. तर भाजपनेते मात्र खडसे भाजप सोडणार नाहीत असा विश्वास व्यक्त करत आहेत. ‘न्यूज18 लोकमत’शी खास बातचित करताना माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केले आहे. एकनाथ खडसे हे भाजप सोडून जाणार नाहीत याची मला खात्री आहे. खडसे हे अनुभवी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसेंच्या पदावरून व आमदारकी वरून चाचपणी देखील झाल्याचं सूत्रांकडून समजत आहे. येत्या १७ तारखेला घटस्थापनेच्या मुहूर्तावर खडसे आपल्या राजकीय घटांची देखील नव्याने स्थापना करू शकतात अशा वृत्तांना जोर आला आहे. गेल्या काही महिन्यात खडसे भाजपला राम-राम ठोकणार अशा चर्चा होत होत्या. मात्र खडसेंनी अनेक वेळा हुलकावणी दिली असून आता सर्वांच लक्ष येत्या १७ तारखेकडे लागलं आहे.

खडसेंच्या पक्षप्रवेशावर आता उत्सुकता वाढत असून राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांना यासंदर्भात प्रश्न केला असता त्यांनी, ‘ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारा,’ असं म्हणत खुलासा करणं टाळलं. तर, ‘ राजकारणात अनेक भेटीगाठी होत असतात. भाजपाचं सरकार असताना आम्हीही लोकप्रतिनिधीच्या नात्याने अनेकदा भेटी घेतल्या होत्या. भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काहीही माहिती नाहीये. जितकी माहिती माझ्याकडे होती ती मी तुम्हाला दिलीये.’ असं सावध वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-