भाजपच्या अडचणीत वाढ, दिलीप गांधी बंडाच्या तयारीत

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीपूर्वी बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केलं आहे. यामध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात फायदा झाला. अहमदनगर जिल्ह्यात सुजय विखेंनी कॉंग्रेसमधून भाजपात प्रवेश केला. विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून सुजय विखेंना पक्षातर्फे तिकीटही देण्यात आलं आहे. त्यामुळे  दिलीप गांधी समर्थक चांगलेच नाराज झाले आहेत.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आता नव्या हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपने तिकीट नाकारल्याने विद्यमान खासदार दिलीप गांधी हे नाराज झाले आहेत. फक्त नाराजचं नाही तर दिलीप गांधी हे बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे. आज दिलीप गांधी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत, या बैठकीनंतर दिलीप गांधींची पुढील वाटचाल ठरण्याची शक्यता आहे. जर खासदार दिलीप गांधी यांनी बंड केल्यास, भाजपला आणि पर्यायाने सुजय विखे यांना जबर फटका बसण्याची शक्यता आहे.