मनुस्मृतीच्या समर्थनासाठी जर कोणी मला धमकावत असेल तर मी पुन्हा मनुस्मृती जाळणार : भुजबळ

नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अज्ञातांकडून धमकी देण्यात आलीय. मनुस्मृतीला विरोध केल्यास ठार मारण्याची धमकी देणारं पत्र छगन भुजबळांना पाठवण्यात आलंय. त्यामुळे नाशिकसह राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मनुस्मृतीला विरोध केल्यास तुमचा ‘पानसरे-दाभोलकर’ करु, अशी धमकी देणारं मजकूर असलेलं पत्र नाशिकमधील ‘भुजबल फार्म’वर पाठवण्यात आलंय. पत्र निनावी असल्याने नेमकं कुणी हे पत्र पाठवलं, ते कळू शकलेलं नाहीय.

‘धमकीच्या पत्राला मी फारसी किंमत देत नाही. मनुस्मृतीच्या समर्थनासाठी जर कोणी मला धमकावत असेल, तर महात्मा फुलेंनी ज्या मनुस्मृतीला जाळा म्हटले ती पुन्हा पुन्हा जाळणार. समतेच्या मार्गावर चालतच राहणार. लढतच राहणार. कोणाला काय करायचे ते करत रहावे,’अशी प्रतिक्रीया भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

‘महात्मा फुलेंनी पाच हजार वर्षे बहुजनांवर अन्याय करणारी मनुस्मृती जाळून टाका हे जाहीरपणे सांगीतले. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. देशाला संविधान दिले. समतेचा विचार दिला. मी त्याच मार्गाने जाईन. कोणी धमकी देत असेल तर मनुस्मृती वारंवार जाळणार. घाबरणार नाही.’असं देखील ते म्हणाले.