ग्रहण कालावधीत साई मंदिर दर्शनाकरिता बंद राहणार

शिर्डी : बुधवार दिनांक ३१ जानेवारी, २०१८ रोजी खग्रास चंद्रग्रहण असल्‍याने सायं. ०५.०० ते रात्रौ ०८.४२ वाजेपर्यंत समाधी मंदिर दर्शनाकरिता बंद राहणार असून यादिवशी श्रींची धुपारती होणार नसल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.

अग्रवाल म्‍हणाल्‍या, दिनांक ३१ जानेवारी, २०१८ रोजी खग्रास चंद्रग्रहण असल्‍यामुळे दुपारी राहू काळ सुरु होणार असल्‍याने समाधी मंदिरातील दैनंदिन कार्यक्रमामध्‍ये बदल करण्‍यात आला आहे. सायंकाळी ०५.०० ते ०८.४२ वाजेपर्यंत समाधी मंदिरात पुजारी श्रींचे समोर मंत्रोच्‍चार करतील. या कालावधीत दर्शन पुर्णपणे बंद राहील. रात्री. ०८.५० वाजता श्रींचे मंगलस्‍नान सुरु होईल. त्‍यांनतर श्रींचे वस्‍त्र अलंकार परिधार करुन श्रींची शिर्डी माझे पंढरपूर ही आरती होईल व त्‍यानंतर दर्शनरांग सुरु होईल. ग्रहण कालावधीमुळे दिनांक ३१ जानेवारी, २०१८ रोजी श्रींची धुपारती होणार नाही.

तसेच ३१ जानेवारी रोजी रात्री. १०.३० वाजता शेजारती व दिनांक ०१ फेब्रुवारी, २०१८ रोजी पहाटे ०४.३० वाजता काकड आरती नियमितपणे होईल. ग्रहण कालावधीत टाईम दर्शन, सशुल्‍क दर्शन व धुपारतीचे पासेस देण्‍यात येणार नाही याची साईभक्‍तांनी नोंद घेवून संस्‍थानला सहकार्य करावे असेही अग्रवाल यांनी सांगितले.