कचरा न उचलणाऱ्या रेड्डी कंपनीवर औरंगाबाद पालिका करणार का कारवाई?

औरंगाबाद : शहरातील रस्त्यांवर पडलेला कचरा न उचलल्यास रेड्डी कंपनीला पहिल्या दिवशी हजार तर दुसऱ्या दिवशी दोन हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. मनपा प्रशासनाने कचरा संकलनाबाबत कुचराई करणाऱ्या रेड्डी कंपनीवर अशाप्रकारे कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यानंतरही शहरातील विविध रस्त्यांवर कचरा तसाच पडलेला दिसून येत आहे. त्यामुळे मनपाने नेहमीप्रमाणे कागदोपत्री घोषणा केल्याचे दिसून येत आहे. सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे मिल कॉर्नर, सिटी चौक, पुंडलिक नगर आदि भागांमध्ये कुजलेल्या कचऱ्याबरोबरच मोकाट जनावरांचाही वावर वाढत आहे.

शहरातील कचरा संकलनात कुचराई करणाऱ्या रेड्डी कंपनीला आता महानगरपालिकेने नियमांचा हवाला देत घेरले आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. शहरात दररोज ३५० मेट्रिक टनच्या वर कचरा जमा होतो. कचरा संकलनासाठी मनपाने बंगळूर येथील रेड्डी या खासगी कंपनीची २ वर्षांपूर्वी नियुक्ती केली आहे. प्रत्येक घरातील कचरा जमा करण्याची जबाबदारी या कंपनीवर आहे. मात्र डोअर टु डोअर कलेक्शनमध्ये कंपनी अपयशी ठरल्याने आज शहरातील औरंगपुरा, सिटी चौक, पुंडलिक नगर, कटकट गेट, बारापुल्ला दरवाजा, जय भवानी नगर, विद्यापीठ परिसर, हर्सूल टि पॉईंट याठिकाणी दुपारनंतरही कचरा दिसून येत आहे. मात्र यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तसेच डेंग्यू, मलेरियाच्या पार्श्वभूमीवर रोगराईची भिती देखील निर्माण झाली आहे.

रेड्डी कंपनीला प्रतिक्विंटल कचऱ्यासाठी १८६३ रुपये मोबदला दिला जातो. तरीही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा आढळून येत आहे. त्यामुळे आता घनकचरा संकलन व वाहतुकीच्या कामामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी पालिकेने सर्व स्वच्छता निरीक्षकांना दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार यापुढे कचरा संकलन पॉईंट तसेच शहरातील रस्त्यांवर पडलेला कचरा सकाळी अकरा वाजेपर्यंत उचलला नाही तर पहिल्या दिवशी एक हजार तर दुसऱ्या दिवशी तब्बल दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अजूनपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने कठोरपणे या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास शहरातील रस्ते स्वच्छ आणि कचरामुक्त होतील.

महत्त्वाच्या बातम्या

IMP