ओखी चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्याला फटका

रत्नागिरी : ओखी चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्याला फटका बसला आहे. वादळामुळे निर्माण झालेल्या वाऱ्यांची तीव्रता आज दुपारनंतर कमी झाली असली, तरी काल रात्रीपासून वादळामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. कोकण किनारपट्टीवर खोल समुद्रात घोंगावणाऱ्या ओखी चक्रीवादळाचा फटक थोड्याफार प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या किनारपट्टीला समुद्री लाटांचा तडाखा बसला आहे. समुद्राच्या अजस्र लाटांचा फटका किनारपट्टीला बसला आहे.

समुद्रकिनारी राहणाऱ्या अनेक वस्त्यांमध्ये समुद्राचे पाणी शिरल्याने भीतीचे वातावरण आहे. प्रशासकीय यंत्रणा या सर्व घटनांकडे जातीनिशी लक्ष ठेवून आहे. आजच्या भरतीत रत्नागिरी तालुक्यातील पंधरामाड- मिऱ्या येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे दगड ढासळले, तर काल रात्रीच्या भरती वेळी बंधाऱ्यावरून समुद्राचे पाणी वस्तीत पोहोचले. त्यामुळे कालची रात्र जागून काढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दापोली तालुक्यात हर्णै येथे आसऱ्यासाठी आलेल्या अनेक मच्छीमारी नौकांनाही लाटांचा सामना करावा लागला. किनारपट्टीवर नांगरून ठेवलेल्या अनेक छोट्या होड्या बेपत्ता झाल्या आहेत. मच्छीमार बेपत्ता झाल्याचे वृत्त मात्र नाही. जिल्ह्यात काल सायंकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. रात्री आणि आज दुपारपर्यंत अनेक ठिकाणी पाऊस पडला. रत्नागिरी तालुक्यातील समुद्रकिनारी असणाऱ्या आरे वारे गावात समुद्राचे पाणी शिरले आहे.

मात्र यामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. तालुक्यातील काळबादेवी, नेवरे, वरवडे येथेही भरतीचे पाणी वाढले असले तरी मानवी वस्तीला कोणताही धोका पोहोचला नाही. पूर्णगड येथे पाण्याची पातळी वाढून पाणी थेट रस्त्यावर आले. पूर्णगड येथील मजदूर मोहल्ला, शितोचेवाडी, श्रीकृष्णनगर येथे लोकवस्तीत मध्यरात्री पाणी घुसले. रात्री साडेबाराच्या सुमारास जोराच्या लाट्या उसळल्याने श्रीराम फडके, वासुदेव पाध्ये यांच्या घरात पाणी घुसले. उधाणामुळे किनारपट्टीवरील लोकवस्तीतील नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.

पूर्णगडप्रमाणेच मांडवी येथेही लाटांचे तांडव पाहायला मिळाले. मांडवी, राजिवडा येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यावरून पाणी रस्त्यावर आले. तेथेही काही घरे पाण्याखाली गेल्याच्या घटना घडल्या आहेत. गावखडी हळदणकरवाडीतील बंधारा फुटून बागायतीमध्ये पाणी भरले असून चार विहिरींमध्ये खारे पाणी गेले आहे. शिवारी बंदर, वरवडे येथे समुद्राच्या भरतीने रस्त्याचे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी नाही.

मिऱ्या व मांडवी येथे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून समुद्रकिनारी जाऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. वातावरणातील बदलामुळे आज शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याने शाळा बंद होत्या.

त्यामुळे रस्त्यांवर विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ नव्हती. दरम्यान, दुपारनंतर वाऱ्यांचा जोर ओसरला. पावसाचे प्रमाणही कमी झाले. समुद्रात उसळणाऱ्या अजस्र लाटांचे प्रमाणही काहीसे कमी झाले आहे. मात्र धोका अजूनही टळला नसल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.