अनैतिक संबंधात अडसर ठरत असणाऱ्या पतीचा केला पत्नीने खून!

बीड: एका तरुणासोबत असलेल्या अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्याने आपल्या पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना गेवराई येथील तलवाडा येथे घडली आहे. गेवराई तालुक्यातील तलवाडा ठाणे हद्दीतील राजापूर शिवारात शनिवारी एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला होता. उत्तरीय तपासणीनंतर त्याचा खून झाल्याचे उघड झाले.

उत्तरीय तपासात हा खून असल्याचे उघड होताच तलवाडा पोलिसांनी गतीने सूत्रे फिरवत २४ तासांत या प्रकरणाची उकल केली. मृत तरुणाची पहिली पत्नी व तिच्या प्रियकराने अनैतिक संबंधांत अडसर ठरत असल्याने हा खून केल्याचे समोर आले. याप्रकरणी दोघांवर तलवाडा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला व पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण (३२, रा. गोळेगाव, ता.गेवराई) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी ज्ञानेश्वरचा मृतदेह राजापूर शिवारातील एका शेतात आढळून आला होता. त्याच्या चेहऱ्यावर जखमा व गळ्याला व्रण दिसून आले होते. त्याचा खून झाल्याचा आरोप आई व पत्नीने पोलिसांसमोर केला होता. सहायक निरीक्षक प्रताप नवघरे यांनी पोलिस अंमलदार कृष्णा वरकड, रामेश्वर खंडागळे यांच्यासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला.

शवविच्छेदन अहवालात त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. सहायक पोलिस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी गतीने या प्रकरणाचा तपास केला. नाना अप्पा शिंदे (रा. गोसावी वस्ती) याला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. नाना शिंदे व मृत ज्ञानेश्वरची पहिली पत्नी छाया यांच्यात अनैतिक संबंध होते, मात्र यात अडसर ठरत असल्याने त्यांनी ज्ञानेश्वरचा खून केला असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली.

महत्वाच्या बातम्या