अमरावतीत मृतकांचे थ्रोट स्वॅब का घेतले जात नाहीत? न्यायालयाची जिल्हा प्रशासनाला विचारणा

blank

अमरावती :  भातकुली शहरातील एका तरुणाचा कोविड रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला मात्र, त्याचा शेवटपर्यंत थ्रोट स्वॅब घेण्यात आला नाही. शिवाय, अमरावतीमध्ये प्रामुख्याने मृत व्यक्तीचा थ्रोट स्वॅब न घेण्याची कारणे कशावर आधारित आहे आणि आतापर्यंत मृतकांचे थ्रोट स्वॅब का घेण्यात आले नाही याची लिखित विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काल अमरावती जिल्हा प्रशासनाला केली आहे.

भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी अमरावती शहरात कोरोनाचा मृत्युदर अधिक असण्यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेची काल पुन्हा सुनावणी होती. या सुनावणीचे निष्कर्ष रात्री उशिरा कामकाज आटोपल्यावर उपलब्ध करून देण्यात आले. काल ऍड. पंकज नवलाणी यांनी जोरदार युक्तिवाद करून अमरावती मध्ये कोविड रुग्णालयात दाखल असलेल्या, कोरोनाची सर्व लक्षणे दिसत असताना अत्यवस्थ असलेल्या युवकाचा थ्रोट स्वॅब घेतला गेला नाही. त्या सोबत आलेल्या लोकांनी वारंवार विनंती केल्यानंतरही त्या युवकाचा स्वॅब घेतला गेला नाही व रुग्णालयातच भातकुलीच्या या युवकाचे निधन झाल्याचा मुद्दा न्यायालयासमोर उपस्थित केला.

प्रशासन आणि डॉक्टरांची मेहनत फळाला आली, तुळजापूर तालुका झाला कोरोनामुक्त

या मृतकाच्या संपर्कात आलेला व्यक्ती कोरोना बाधित निघाला. या प्रकरणावरून पुन्हा एकदा जिल्हा आरोग्य यंत्रणेचा अक्षम्य, भोंगळ व निष्काळजी कारभार चव्हाट्यावर आला. रुग्णालयात उपचारार्थ दाखल असताना त्याचा थ्रोट स्वॅब न घेणे हे अक्षम्य आहे. शिवाय, अमरावती मध्ये मृतकाचा थ्रोट स्वॅब घेतला जाणार नाही, हे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वांनुसार मृतकाचा स्वॅब घेणे आणि त्या मृतकाची नोंद कोविड अंतर्गत समाविष्ट करण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. जो पर्यंत स्वॅबचा अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यंत तो मृतदेह शवागारातच ठेवण्याच्या सूचना असतानाही हे निकष अमरावतीमध्ये का अवलंबले जात नाहीत, असा प्रश्न ऍड. नवलाणी यांनी न्यायलयासमोर उपस्थित केला.

या प्रश्नावर समाधानकारक उत्तर दिले गेले नसल्याने न्यायालय देखील अवाक झाले होते. अखेर मृतकांचे थ्रोट स्वॅब घेण्या संदर्भात अमरावतीमध्ये कोणते निकष वापरण्यात आले, याची विचारणा न्यायालयाने अमरावती जिल्हा प्रशासनाला केली आहे. आतापर्यंत चार किंवा त्याहून अधिक मृतकांचे स्वॅब घेतले गेले नसल्याने स्वाभाविकच मृत्युदर कमी दिसतो आहे. या मागच्या शास्त्रीय कारणांची मीमांसा न्यायालयाने लिखित स्वरूपात मागितली आहे.

कोविड रुग्णांच्या अती निकट संपर्कात ( हाय रिस्क कॉन्टॅक्ट ) आलेल्या सर्व लोकांचे थ्रोट स्वॅब का घेतले गेले नाही, हा प्रश्न देखील ऍड. नवलाणी यांनी उपस्थित केला. या संदर्भात प्रशासकीय विभाग एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करून परस्परविरोधी उत्तरे देत असल्याची बाबही ऍड. नवलाणी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. पुढच्या मंगळवारी 9 जून रोजी होणाऱ्या सुनावणी दरम्यान यावर पुन्हा आरोग्य प्रशासनाला आपली लिखित बाजू मांडावी लागणार आहे.

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला झाला कोरोना

आजच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने याचिकेत दाखल केलेल्या विविध मुद्द्यांचा पुन्हा एकदा आढावा घेतला. अमरावतीला कोरोना टेस्टिंग प्रयोगशाळा सुरू झाली असून आता लोकांना कोरोनासोबतच जगण्याची सवय लावून घ्यावी लागणार असल्याने याचिकेचे औचित्य संपुष्टात आले असल्याचा युक्तिवाद प्रतिवादींच्या वकिलांकडून करण्यात आला. विविध जनहित याचिकांच्या संदर्भातही न्यायालयात चर्चा झाली. या जनहित याचिकेत मांडण्यात आलेल्या त्रुटी, उणिवा आणि अपेक्षा यावरही न्यायालयात चर्चा झाली. गेल्या सुनावणींमध्ये न्यायालयाने जिल्हा प्रशासनातील विविध विभागांना दिलेल्या सुचनांसंदर्भात अंमलबजावणीचा आढावा घेतला. याचिका दाखल झाल्यानंतर 40 दिवसांपासून रखडलेली कोविड टेस्टिंग लॅबोरेटरी 5 दिवसात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सुरू करण्यात आली. लॉक डाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात लॉक डाऊनचे कसोशीने पालन करण्यात यावे, अशी अपेक्षा याचिकर्त्यांनी व्यक्त केली होती.

त्यानंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुरू केलेल्या कारवायांचा लिखित अहवाल पोलिस प्रशासनाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. या सुनावणीनंतर चौका चौकात उभे असलेले पोलीस दंडात्मक कारवाई करू लागले आणि अशा सर्व कारवायांचा आढावा न्यायालयासमोर आला आहे.
10 हजार रॅपिड अँटिबॉडी टेस्टिंग किट्सची मागणी अमरावती महापालिकेकडून केली गेली असून अमरावती शहराच्या विविध भागात केलेल्या सर्वेक्षणाचा गोषवारा देखील प्राप्त झाला आहे. राज्याच्या धोरणावर पुढची कारवाई अवलंबून असल्याचे महापालिकेकडून न्यायालयासमोर स्पष्ट करण्यात आले. कोरोनामुळे संपूर्ण राज्याची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत असताना राज्याने आयसीएमआर ने नव्याने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार तात्काळ रॅपिड अँटीबॉडी टेस्टिंग किट्स बोलवून कोरोनाग्रस्त भागात युद्धस्तरावर टेस्टिंग करावे, असे महत्वपूर्ण निर्देश देखील न्यायालयाने याचिकेच्या दरम्यान दिले आहेत.

कोविड रुग्णालयात थ्रोट स्वॅब घेण्यासाठी आलेल्या रुग्णांची हेळसांड झाल्या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांनी न्यायालयासमोर क्षमायाचना मागून तिथे आवश्यक त्या सुधारणा केल्या असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

राज्यात अजूनही कोरोना प्रकरणी सर्वाधिक मृत्युदर अमरावतीचा असल्याने जिल्हाधिकारी, अमरावती महापालिका आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी परस्परांकडे अंगुलीनिर्देश न करता समन्वयातून यातील त्रुटी व उणिवा दूर करण्यासंबंधीच्या ठोस सूचना उच्च न्यायालयाने संबंधित सर्वांना दिल्या आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि सर्वाधिक मृत्युदर अमरावतीत असल्याने न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त होती. अमरावतीत आयसीएमआरच्या निकषांप्रमाणे यंत्रणा राबवली जाते आहे की नाही यासंदर्भात लेखी जवाब संबंधित यंत्रणांना मागितला होता. यासंदर्भात नागपूरहून तज्ञ डॉक्टरांच्या समितीने अमरावतीला भेट देऊन या संदर्भात आणखी कुठली काळजी घेतली पाहिजे, या संदर्भातील ठोस सूचना मांडल्या आहेत.

कमाईमध्ये घसरण होऊन देखील अक्षयने पटकावले जगातील श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीमध्ये नाव

सुनावणीत झालेल्या चर्चेनंतर अमरावती विभागीय आयुक्तांनी विशेष पुढाकार घेऊन तज्ञ डॉक्टरांची चमू अमरावतीत पाहणी करण्यासाठी यावी, असे विशेष प्रयत्न केले होते. न्यायालयासमोर हे देखील मांडण्यात आले. जनहित याचिकेच्या माधतमातून जे काही प्रश्न प्रत्येक सुनावणी दरम्यान उपस्थित केले त्या संदर्भात शपथपत्रावर लिखित स्वरूपात प्रत्येकाने आपले म्हणणे मांडले असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आपापली जबाबदारी ओळखून काम करण्याची अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली आहे.

न्यायालयाने हा आढावा जनहित याचिकेच्या औचित्याच्या उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या आधारे घेतला. याचिकाकर्त्याने आपल्या प्रारंभिक मांडणी केलेल्या मुद्द्यांच्या आधारे अमरावतीत अंमलबजावणी होत असल्याबद्दल आणि कठीण परिस्थितीत सर्वांना काम करावे लागत असल्याबद्दल न्यायालयाने प्रशासनाविषयी कौतुकाचेही शब्द काढले.
आजच्या सुनावणीत आयसीएमआरच्या वतीने ऍड. उल्हास औरंगाबादकर, सरकारी वकील म्हणून ऍड. सुमंत देवपूजारी तर अमरावती मनपाच्या वतीने ऍड. जेमिनी कासट यांनी युक्तिवाद केला.