गुरुविण अनुभव कैसा कळे…

गुरू म्हणजे काय?

गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णु: गुरूर्देवो महेश्वर:।

गुरु:साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः।

आपणा सर्वांना परिचित असणारा हा श्लोक, या श्लोकात तर गुरूला वंदन करून गुरूला देवतुल्य दर्जा दिलेला आहे. हिंदू संस्कृतीत तर अनेक थोर संतांनी ग्रंथ लिहून संतांना वाट दाखवली. गुरू नसेल,गुरुचे मार्गदर्शन नसेल, तर आपले काय बिघडणार?  असा एक प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये उभा असतो अगदी माझा मनात सुद्धा तो आहेच. मग या प्रश्नांची उत्तरे मिळवून गुरूंची आवश्यकता जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर संतांच्या जीवनातील प्रसंग आणि त्यांच्या वाङ्मयाचा विचार आपल्याला करणे गरजेचे आहे.  तोच आपण इथे करणार आहोत. रामदास स्वामींनी आपल्या दासबोध नामक ग्रंथात विद्या गुरू,दीक्षा गुरू,मोक्ष गुरू अर्थात (सद्गुरू) यांचे वर्णन केले आहे. पण इथे आपल्याला विद्या गुरू,दीक्षा गुरू न पाहता सद्गुरूंची आवश्यकता पहायची आहे.

विघडले देव आणि भक्त। जीव शिव पणे द्वैत।

तया देव भक्ता एकांत। करी तो सद्गुरू।

वास्तविक जीव (आपण) आणि शिव (परमात्मा) एकच आहोत. पण इथे जन्माला आल्याच्या नंतर संसारातल्या रहाट गाड्यात आपण इतके पिचलो जातो की आपण आणि देव एकच आहोत हे विसरून वागायला लागतो.  म्हणजे थोडक्यात काय? तर आपण आपली स्वतःचीच ओळख विसरून जातो. ती आपली ओळख आपल्याला करवून देऊन जे परमेश्वर भेटवून देतात ते सद्गुरू आत्मस्वरूप दाखवतात. म्हणून तर आपल्या वाङ्मयात रसाळ वाणीन सद्गुरूंच महात्म्य सांगताना श्री दासगणू महाराज म्हणतात-

आत्मस्वरूपा पाहणे असण्या,दर्पण घ्या गुरू हाती।

अन्यथाच होईल जगती,सारीच ही फटफजिती।

हा तुकोबांच्या एका अभंगाचाच भावार्थ आहे. तोच दासगणू महाराज त्यांच्या अभंगात सांगतात.  तु. महाराज म्हणतात-

सद्गुरु वाचोनी सापडेना सोय। धरावेते पाय आधी आधी।

देव जर मिळवायचा असेल किंवा पूर्वसुकृताने जर देव मिळाला असेलही पण तो जर कळालाच नसेल तर त्या मिळालेल्या देवाचा फायदा काय? तर तो मिळालेला देव कळण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता असते. संतश्रेष्ठ नामदेव महाराजांना पांडुरंग मिळाला पण कळाला नाही म्हणजे त्याचे स्वरूप,त्याची व्याप्ती कळण्यासाठी गुरूंना म्हणजेच विसोबा खेचरांना शरण जावे लागले.  त्यामळे गुरू असल्या शिवाय आपल्याला गत्यंतर नाही.  कबिरजी म्हणतात-

गुरुबिन कोन बताये बाट। बडा बिकट यमघाट।

सगळ्या संतांनीच नव्हे तर देवांनी सुद्धा सद्गुरूला एका उच्च स्थानावर नेऊन ठेवलेलं आहे. भगवान शिवजी पार्वतीला  म्हणतात

न गुरोरधिकम् न गुरोरधिकम् न गुरोरधिकम्।

मम शासनत: मम शासनत: मम शासनत:।

म्हणजे गुरुपेक्षा अधिक काहीच नाहीये.  माझं शासन सुद्धा गुपेक्षा कमीच आहे.  त्याच्या पुढे माझं सुद्धा काहीच चालत नाही. एकनाथ महाराज म्हणतात ‘तुम्हाला तंत्र,मंत्र,उपदेश देणारे भरपूर गुरू मिळतील पण आपल्या शिष्यास सद्वस्तूची ओळख करून देणाराच सद्गुरू होऊ शकतो.  नाथ महाराज माऊलींना गुरू म्हणूनच संबोधतात’.

एका जनार्दनीं पूर्वपुण्य फळले। श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर।

अशी ही गुरूंची महिमा अपरंपार आहे.

गुरुविण नाही गती…….

 

लेखक

कृष्णा नंदकुमार रामदासी (बीड)