मतदारसंघातील कामं न झाल्याने आपण आमदारकीचा राजीनामा दिला, शिवेंद्रराजेंचे स्पष्टीकरण

टीम महाराष्ट्र देशा : मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते पक्षाला रामराम करून भाजपात प्रवेश घेताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, आज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सोपविला. या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीत मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीची आणखी हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर प्रतिक्रिया देताना शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितलं की, “मतदारसंघातील कामं न झाल्याने आपण आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे. आज संध्याकाळी कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. भाजपासोबत जाणं जास्त योग्य होईल असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे”.

पुढे बोलताना त्यांनी आपण शरद पवारांचा शब्द डावलत नसल्याचंही सांगितलं तसंच मी भाजपाकडे कोणतीही मागणी केलेली नाही. “माझं प्राधान्य मतदारसंघ आणि त्यातील कामाला असेल”, असं त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस – राष्ट्वादीचं सरकार येईल याबाबत शंका आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छातीठोकपणे शिवेंद्रराजे, संग्राम जगताप पक्ष सोडणार नाहीत अस सांगितले होते मात्र शिवेंद्रराजे यांनी राजीनामा दिल्याने पवारांची चांगलीच नाचक्की झाली आहे.

आघाडीला धक्का : ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचा पुतण्याही हाती बांधणार शिवबंधन ?

ज्या पक्षात जनतेच्या विकासाचे हित असेल तिथे मी जाणार – शिवेंद्रराजे भोसले