पवारांसारखा धुरंधर नेता असूनही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महाराष्ट्रात एकहाती सत्ता का मिळवू शकला नाही?

शरद पवार

मुंबई – आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना देखील मोठ्या विचित्र परिस्थितीमध्ये झाली होती. शरद पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पण त्याआधी ते काँग्रेस पक्षात कार्यरत होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा शरद पवारांनी उपस्थित केला होता. तसं पत्रही त्यांनी काँग्रेस नेतृत्वाला लिहलं होतं.

शरद पवारांच्या या पत्रानंतर काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीनंतर शरद पवार यांच्यासह तारिक अन्वर आणि मेघालयातील पी. एम. संगमा यांना सहा वर्षासाठी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. प पवारांच्या या भूमिकेला कडाडून विरोध झाला आणि पवारांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं. यानंतर काँग्रेसनं 25 मे 1999 ला हकालपट्टी केल्यानंतर शरद पवारांनी 15 दिवसांतच म्हणजे 10 जून 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.

यानंतर प्रफुल्ल पटेल, पद्मसिंह पाटील, मोहिते पाटील, छगन भुजबळांसह अनेक बडे नेते काँग्रेस सोडून पवारांसोबत गेले.राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काही महिन्यांतच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीने 58 जागा जिंकल्या. पवारांसाठी हा मोठाच विजय होता. भाजप-शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पवारांनी पुन्हा काँग्रेसशी हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली.

पहिल्या पाच वर्षांत व्यापक कार्यपद्धतीमुळे जनतेने २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले समर्थन दिले. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली युपीए सरकार सत्तेत आले. या वेळी शरद पवार आणि प्रफुल पटेल यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. पवार यांच्यावर कृषी, सहकार, पशुसंवर्धन मत्स्योत्पादन, ग्राहक संरक्षण व अन्न नागरी पुरवठा या खात्यांची जबाबदारी सोपविण्यात आली. दहा वर्षे पवार यांनी कृषी खात्याची जबाबदारी सांभाळली आणि देदीप्यमान काम करून या खात्याचा चेहरामोहरा बदलून टाकला.

दरम्यान,हे सर्व जरी खरे असले तरीही राज्यातील राजकारणात राष्ट्रवादीला म्हणावे तेवढे यश मिळाले नाही.पवारांनी नेहमीच बेरजेचे राजकारण केले; पण त्याचा पक्षवाढीस फायदा झाला नाही. हा पक्ष कायम संकुचित चौकटीत का अडकला असे दिसून येते. वेळोवेळी बदलत जाणाऱ्या भूमिका देखील या पक्षाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.

जातीयवादी राजकारणाचे,भ्रष्टाचाराचे,अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचे आरोप या पक्षावर नेहमीच होत असतात यामुळेच सर्व समाज, प्रदेश किंवा विविध घटकांचा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळवता आलेला नाही. सत्तेत कायम वाटा असणारा, दिग्गज नेत्यांची रांग असणारा हा पक्ष महाराष्ट्रात एकहाती सत्ता का मिळवू शकला नाही? भाजपा महाराष्ट्रात एकहाती सत्तेच्या निकट पोहोचला,अगदी शंभरीपार सुद्धा गेला, पण ‘राष्ट्रवादी’ का नाही तिथं पोहोचला?या प्रश्नांची उत्तरे शोधून उपाययोजना केल्याशिवाय राष्ट्रवादीचा विस्तार होणार नाही हे ही तेवढंच खरे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP