‘ईडी’च कशाला, ‘युनो’मार्फत ‘कडकनाथ’ची चौकशी करा

blank

टीम महाराष्ट्र देशा – राजू शेट्टी यांना माझ्यावर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही. तसेच राज्य मंत्रिमंडळात त्यांना स्थान न मिळाल्याने ते निराश झाले आहेत. त्यांचे सगळे गुण माहिती असल्यानेच त्यांना महाविकास आघाडीने मंत्रिमंडळात घेतले नाही,अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांच्यावर केली आहे.

आज सकाळी पंढरपूर येथे माजी खासदार राजू शेट्टी यांनी  ‘सदाभाऊ फालतू आहेत’ अशी टीका सदाभाऊ खोत यांच्यावर केली होती. त्याला खोत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘या माणसाने शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न चिघळत ठेवले. स्वतःचे नेतृत्व मोठे व्हावे याच हेतूने काम केले. सगळ्यांना गोड बोलायचे आणि ढाक लावायची हाच त्यांचा उद्योग आहे. माझ्यावर आरोप करण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या मनाला विचारावे आपण चळवळीसाठी किती प्रामाणिक राहिला.’ असा सवालही खोत यांनी शेट्टी यांना विचारला.

तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील लोकांनी घरी बसवले. त्यातून सावरत नाहीत तोच महाआघाडीच्या नेत्यांनीही मंत्रिपद दिले नाही. त्यामुळे शेट्टी निराश झाले आहेत. त्या निराशेतून ते माझ्यावर टीका करत आहेत,असे खोत म्हणाले.

तसेच कडकनाथबद्दल माझी चौकशी ‘इडी’मार्फत करण्याची मागणी शेट्टी करत आहेत. माझी तर अशी मागणी आहे, ‘युनो’मार्फत चौकशी करा. कर नाही तर डर कशाला? असेही खोत यावेळी म्हणाले.