‘कर नाही त्याला डर कशाला? अनिल परबांनी चौकशीला सामोरं जावे’, चंद्रकांत पाटलांचे आव्हान

मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील बंगल्याजवळ स्फोटक ठेवल्याप्रकरणी सचिन वाझे एनआयएच्या ताब्यात आहे. सचिन वाझेंनी एनआयएच्या न्यायालयात पत्र लिहून परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

‘अनिल परब यांनी काही चुकीचे केलंच नसेल तर मग कशाला हिंदूऱ्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मुलींची शपथ घेऊन त्रागा करत आहात. कर नाही त्याला डर कशाला? अनिल परबांनी चौकशीला सामोरं जावे’ असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, येत्या १५ दिवसांत आणखी २-३ मंत्र्याचे राजीनामा होणार हा सामान्यांचा अंदाज आहे. वाट पाहून आणखी कोणी कोर्टात जाईल. क्रिकेटच्या मॅचमध्ये पहिले दोन बॅट्समन आऊट व्हायला वेळ लागतो. अनिल परबांचा त्रागा आहे. चौकशीला सामोरे जाणार असेल तर शपथा कसल्या घेताय? निष्पक्षपणे चौकशी व्हावी म्हणून राजीनामा दिला आणि सुप्रीम कोर्टात चौकशी होऊ नये म्हणून गेले. सर्वसामान्य माणूस सरकारच्या या प्रकाराला वैतागला आहे. राठोड झाले, देशमुख झाले आणि परबांचे नाव आले आहे. ही संघटीत गुन्हेगारी आहे. या संघटीत गुन्ह्याचे पुरावे कागदपत्रात आले तर या सर्वांवर मोक्का लावावा असं त्यांनी सांगितले.

अनिल परब यांच्यावर काय आरोप?
सचिन वाझेंनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केलाय की एसबीयुटी प्रकल्पाच्या ट्रस्टींकडून ५० लाख रुपये मागितले. त्यांनी दुसरा आरोप केलाय की जानेवारी २०२१ला मुंबई पालिकेच्या कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना दिल्या. परंतु या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत असे म्हणत अनिल परब यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. मी आरोप नाकारतोय. मी सच्चा शिवसैनिक आहे. माझ्यावर खंडणीचे कोणतेही संस्कार नाहीत, असेही परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.