…हा विचार हिंसा करणाऱ्यांच्या डोक्यात का आला नाही?- संजय राऊत

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर ८ एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. दरम्यान, या मुद्द्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadavarte) यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘शरद पवार यांच्याबाबतीत भाजपने दत्तक घेतलेल्या नवरत्नांनी सांगली वगैरे भागात जी भाषा वापरली, तोच कित्ता गुणरत्नाने गिरवला. म्हणजे शाळा तीच आहे. गुणरत्नाने एस.टी. कर्मचाऱ्यांसमोरअनेकदा चिथावणीची भाषणे केली व पवारांच्या घरात घुसून जाब विचारण्याचे आव्हान दिले. कामगारांचे प्रश्न सुटावेत असे सरकारला वाटत होते, पण भाजप व त्यांच्या गुणरत्नांना तसे वाटत नसावे. वातावरण अधिकाधिक चिघळावे यासाठीच प्रयत्न केले गेले. भाजपचे फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री होते. त्या काळात एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण का झाले नाही, हा विचार हिंसा करणाऱ्यांच्या डोक्यात का आला नाही?’, असा सवाल राऊतांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले की, ‘कामगार नेते म्हणून गर्जना करणाऱ्या गुणरत्नांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान आणि कामगारांचे हक्क-अधिकार याबाबत बेताल भाषणे केली. गेल्या चारेक महिन्यांपासून ज्या पद्धतीची चिथावणीखोर आणि माथेफिरू पद्धतीची भाषणे हे गुणरत्ने करीत होते, तेव्हाच मुंबईतील कायद्याच्या रक्षकांनी सावध व्हायला हवे होते. शहरी नक्षलवाद समजून घ्यायचा असेल तर गुणरत्नाच्या वर्तनाकडे व भाषेकडे डोळसपणे पाहायला हवे.’

दरम्यान, भाजपच्या काही नेत्यांनी मधल्या काळात शहरी नक्षलवादावर चिंता व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांनी शहरी नक्षलवादावर संसदेत भाषण केले आहे. शहरी नक्षलवाद हा अल कायदापेक्षा भयंकर आहे. शहरी नक्षलवाद हा उच्चशिक्षित, शहरी सुटाबुटात समाजात वावरत आहे व देश वारुळाप्रमाणे पोखरत आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणात अटकेत असलेले अनेक लेखक, विचारवंत, कवी यांच्यावर शहरी नक्षलवादी असल्याचा ठपका आहे. त्यांना फडणवीस व मोदींचे राज्य उलथवून टाकायचे होते, त्यांच्यापासून फडणवीस-मोदींच्या जीवितासही धोका होता असे आक्षेप आणि आरोप भाजपची मंडळी सातत्याने करीत आली आहेत. सध्याच्या गुणरत्नाच्या कारवायाही त्याच शहरी नक्षलवादी चौकटीतच सुरू आहेत व त्याला खतपाणी घालण्याचे काम महाराष्ट्रातील विरोधी पक्ष करीत होता, असेही राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –