महापुरुषांपेक्षा मोदी मोठे झाले का ? सरकारी कार्यालयातील प्रतापामुळे सोशल मिडीयावर संताप

वरळी येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये महापुरुषांच्या प्रतिमेपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फोटो लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या हेच फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच महापुरुषांपेक्षा नरेंद्र मोदी मोठे झाले का? असा सवाल देखील विचारला जात आहे.

मुंबईमध्ये वकिली करणारे अॅड शरद राऊत हे कामा निमित्त वरळी येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात गेले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले या महापुरुषांच्या सोबतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही प्रतिमा लावण्यात आली होती. मात्र यामध्ये तिन्ही महापुरुषांच्या प्रतिमा लहान तर नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मोठी होती. राऊत यांनी संबंधित प्रकार अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिला. मात्र, अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी बोलाव लागेल म्हणत विषय टाळण्याचा प्रयत्न केल्याच अॅड शरद राऊत यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना सांगितले.

अॅड शरद राऊत म्हणाले ‘सरकारी कार्यालयामध्ये महापुरुषांच्या प्रतिमा लावण्याचा नियम आहे. त्याचप्रमाणे देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचेही फोटो लावणे गरजेच आहे. मात्र या प्रतिमा लावत असताना काही नियम पाळणे गरजेच आहे. जे वरळी सह दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये पाळण्यात आले नाहीत. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदर आहे. मात्र, महापुरुषांच्या फोटोपेक्षा त्यांचा मोठा फोटो लावणे चीड आणणारी घटना आहे. याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना फोटो फ्रेम बदलण्यासाठी एक लेखी तक्रार दिली आहे.

सरकारी कार्यालयांमध्ये महापुरुषांच्या प्रतिमा लावण्याचा एक प्रोटोकॉल आहे. त्यामध्ये देशासाठी योगदान दिलेल्या महापुरुषांचे फोटो योग्य सन्मानाने लावणे गरजेच आहे. नजीकच्या काळात अनेक ठिकाणी हे नियम पायदळी तुडवले जात असल्याच दिसून येत आहे. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदर आहे. मात्र, अशा प्रकारे फोटो लावणे म्हणजे महापुरुषांची अवहेलना करण्यात येत असल्याचा म्हणत अनेक नेटकऱ्यांनी सोशल मिडीयावर संताप व्यक्त केला आहे.

adv sharad raut fb post
अॅड शरद राऊत यांची फेसबुक पोस्ट