Share

Explained | शेलार म्हणतात हे ‘उपरे’, ठाकरे म्हणतात ही ‘हिटलरशाही’ ; एका पोटनिवडणुकीसाठी एवढा तमाशा!

अंधेरीत ठाकरे गट आणि भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका करत आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके (Rutuja Latke) तर भाजप-शिंदे गटाकडून मुरजी पटेल (Murji Patel), असा सामना रंगणार आहे. ऋतुजा लटके यांच्यासाठी अनिल परब, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane), दिपक केसरकर (Deepak Kesarkar), आशिष शेलार (Ashish Shelar) मैदानात आहेत. त्यामुळे ही निवडणूक भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्वाची आहे. एकीकडे ही निवडणूक बिनविरोध होण्याची अपेक्षा असताना भाजपने मोठा डाव खेळत ही निवडणूक अस्तिवाची बनवली आहे.

एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की अंधेरी पूर्व मतदार संघ (Andheri East Constituency) आधी शिवसेनेच्या ताब्यात होता. दिवंगत रमेश लटके (Ramesh Latke) हे शिवसेनेचे आमदार होते. आता त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) निवडणूक लढवणार आहेत. साध्या लिपीक पदाच्या राजीनाम्यासाठी त्यांना राजकीय दबावापोटी मोठा संघर्ष करावा लागला. शेवटी न्यायालयाने बीएमसीला खडसावत ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा दिला. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्रात आतापर्यंत अशा निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला आणि पोटनिवडणूक झाली जर त्यांच्या घरचा सदस्य उभा असले. तर महाराष्ट्रात निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. मात्र आता राज्याची निवडणूक असल्याचे वातावरण भाजपने तयार केले आहे. हे द्वेषाचे राजकारण आहे. यात विजय कोणाचाही झाला तरी जनतेला वेठीस धरण्याचे काम हे राजकारणी करत आहेत.

निवडणूक बिनविरोध का नाही?

भाजपने अडीच वर्ष मुख्यमंत्री पद नाकारल्याचे सांगत २०१९ ला शिवसेनेने महाविकास आघाडीच्या पाठींब्याने सरकार स्थापन केले. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा अजित पवारांसोबत सकाळचा शपथविधी फसला होता. यामुळे भाजपला राज्यात नाही तर देशात तोंडावर पडावे लागेल होते. हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्राला माहित आहे. तेव्हापासून भाजप शिवसेनेवर लक्ष ठेऊन होते. संधी मिळताच भाजपने शिवसेनेवर हल्ला केला आणि शिवसेनेचे ४० आमदार फोडले. यामुळे सेनेचा वेगळा ‘शिंदे गट’ निर्माण झाला. त्यांनी संपूर्ण शिवसेनेवर आपला दावा सांगितला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शिंदे गटासोबत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेना पक्षाचे नाव, चिन्ह देखील गोठवले गेले. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का होता. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मात देण्यासाठी भाजपने अंधेरी पूर्व मतदार संघात उमेदवार दिला आहे. शिंदे गटाचा देखील भाजप उमेदवाराला पाठींबा आहे.

उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी भाजप हे राजकारण करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची भूमिका आहे. एकनाथ शिंदे यांचा चेहरा समोर करुन शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव असल्याचे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.

भाजप आणि ठाकरे गटांचा एकमेकांवर हल्लाबोल-

यावेळी आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल केला. “मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्थानिकांचा महापूर आहे. अंधेरी पूर्व जनतेचा स्वत:च्या प्रेमाचा हा पूर आहे आणि आमच्या समोर दहा पक्षांना घेऊन. १० तोंडाचा रावण उभा आहे. ते उपरे बाहेरून लोक बोलवत आहेत.  त्यामुळे हा निवडणुकीचा संघर्ष अनिल परब आणि त्यांच्या विभागातील उपरे तर मुरजी पटेल आणि स्थानिक यांच्यात होणार आहे. भाजप, रिपाई, बाळासाहेबांची शिवसेना या महायुतीचा २५ हजार मतांनी विजय होणार”, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी देखील आशिष शेलार यांच्यावर पलटवार केला. “ऋतुजा लटके यांचा राजीनामा न स्विकारणे ह्या गोष्टी हिटलरशाहीमध्ये चालत असतात. ह्या गोष्टी लोकशाहीमध्ये चालत नाहीत. छत्रपती शिवाजी पार्कवरील आमचा दसरा मेळावा आणि आता निवडणुकीसाठी न्यायालयातून सत्याचा विजय झाला आहे. आम्ही संविधानासोबत आहोत. लोकशाही सोबत आहोत. हे गद्दार आणि खोके सरकार पाठीमागून वार करत आहेत. खोकेसूर फॅसिझमच्या बाजूने असल्याचे आज दिसून येत आहे. आशिष शेलार ४० गद्दारांना उपरे बोलतात, जे त्यांच्या डोक्यावर बसले आहेत,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

अंधेरीत ठाकरे गट आणि भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका करत आहे. अंधेरी पूर्व …

पुढे वाचा

Explained Maharashtra Marathi News Politics