बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का नाही होऊ शकत : निलेश राणे

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्याच्या दौऱ्या दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत मोदी सरकारला चिमटा काढताना राम मंदिर एका क्षणात का नाही होऊ शकत असं भाष्य केलं होत. शिवसेना सध्या केंद्रात, राज्यात आणि मुंबई महापालिकेत सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या राम मंदिराविषयीच्या भाष्याला विरोधकांनी लक्ष केलं आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि रत्नागिरीचे माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना बोचरा प्रश्न केला आहे. राम मंदिर एका क्षणात का नाही होऊ शकत या उद्धव ठाकरेंच्या विधानाचा संदर्भ घेत निलेश राणे यांनी केंद्रात, राज्यात आणि मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेला आणि अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांना प्रश्न केला आहे की, ‘बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का नाही होऊ शकत?’.

स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा भावनिक मुद्दा त्यावेळी शिवसेनेने उचलून धरला होता. परंतु सत्तेत येऊन इतकी वर्ष स्वर्गीय. बाळासाहेबांच्या त्या स्मारकाची साधी वीट सुद्धा रचली न गेल्याने निलेश राणें’ना आयतीच संधी मिळाली असून त्यांनी अचूक वेळ साधत उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका करणारा प्रश्न उपस्थित केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर आले होते. तेव्हा ते बोलतांना म्हणाले, ‘नोटाबंदी एका क्षणात होऊ शकते तसे राम मंदिर का नाही होऊ शकत?’ असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला होता. राम मंदिर, समान नागरी कायदा, ३७० कलम रद्द करणे या सगळ्या गोष्टी आजपर्यंत का नाही झाल्या? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.