‘फोटो, ऑडिओ क्लिप्स समोर येऊन देखील ठाकरे, पवार गप्प का ?’

sharad pawar

पुणे : राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड हे पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर नॉट रिचेबल होते. मात्र, आज ते समोर आले. यावेळी पोहरादेवी या ठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांना फेटाळलं आहे. संजय राठोड यांच्या या दौऱ्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता टीकास्त्र सोडलं आहे.

विविध प्रसिद्धी माध्यमांमधून त्या मंत्र्याच्या समर्थकांचा जल्लोष व गाड्यांची मिरवणूक राज्यातील जनतेने पाहिली. विशेष म्हणजे आज एका वृत वाहिनीवर त्या मंत्र्यांचे मृत तरुणीसोबतचे फोटोही प्रसिद्ध झाले आहेत, मग अद्यापही या मंत्र्यांविरुध्द ठाकरे सरकारने कारवाई का केली नाही ? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. तर, ‘त्या मंत्र्यांच्या विरोधात एवढे पुरावे समोर येऊनही अजून काय सिद्ध होणे बाकी आहे? राज्य सरकार अजूनही ढिम्मपणे बघ्याची भूमिका घेत आहे,’ अशी टीका देखील पाटील यांनी केली.

पुढे ते म्हणाले, ‘सत्तेचा गैरवापर करून कायदा खिशात घालण्याची परिसीमा या ठाकरे सरकारने ओलांडली आहे. या सर्व घडामोडी महाराष्ट्राच्या जनतेसमोर सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार गप्प का आहेत?’ असा सवाल त्यांनी केला आहे. याआधी ऑडिओ क्लिप्स देखील समोर आल्या होत्या. मात्र, महाराष्ट्राच्या अस्मितेचे संरक्षण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून अपेक्षित असताना ते त्यांच्याच मंत्रीमंडळातील एका आरोपीला वाचवत आहेत असा आरोप देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या