शेतकरी विम्यापासून वंचित का? भाजप नेत्याचे कृषिमंत्र्यांना पत्र

rana jagjeetsinh patil

उस्मानाबाद : जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले बहुतांश शेतकरी तांत्रिक कारणामुळे पीक विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. शेतकरी या मदतीपासून वंचित का राहत आहेत? शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली. तसेच या मुद्द्यावर बैठक लावण्याचीही मागणी केली आहे.

आमदार पाटील यांनी यासंदर्भात दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, करारामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पीक काढणी पश्चात झालेल्या नुकसानीबाबत विमा कंपनीला बाधित शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत फोटोसह अवगत करण्याबाबत एक अट आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अभूतपूर्व अवकाळी अतिवृष्टीमुळे शेतमालासह शेतीचे प्रचंड नूकसान झाले होते व बाधित शेतकरी ७२ तासांमध्ये विमा कंपनीला माहिती कळवू शकत नव्हते. जिल्हा प्रशासनाला ही बाब लक्षात आणून दिल्यावरही अट काही प्रमाणात शिथिल करण्यात आली. परंतु २४ ऑक्टोबरनंतर आलेले अर्ज गृहीत न धरण्याची भूमिका विमा कंपनीने घेतली होती.

याबाबत अनेक दिवस पाठपुरावा केल्यानंतर कृषी आयुक्तांच्या सहकार्याने अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीने ११ जानेवारी रोजी मान्य केले आहे. परंतु बहुतांश शेतकरी अर्जच करू शकले नाहीत. ते नुकसान भरपाईपासून वंचित राहत असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या बाधित शेतकऱ्यांना ७२ तासांत अर्ज करण्याची अट शिथिल करण्याचे अधिकार कोणाला आहेत? १४ ऑक्टोबर रोजी अतिवृष्टी झाल्यानंतरही अट शिथिल करत १७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज स्वीकारण्याची निर्णय प्रक्रिया कशी झाली? या प्रकरणी राज्य सरकारची भूमिका काय? असे प्रश्न त्यांनी केले.

महत्वाच्या बातम्या