मुंबई : पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. “ज्यांना मी नको आहे, त्यांनी तसे येऊन सांगावे किंवा फोनवर बोलावे”,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना केले. ठाकरेंच्या या भूमिकेवर पृथ्वीराज चव्हाण यांनी शंका व्यक्त केली आहे. ही सेना नेमकी कोणाची आहे हे कळत नाहीये, असेही ते म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “मला हे समजत नाही, ते महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतात, मग ते भाजपसोबत जाणार आहेत का? अर्थात अधिकृपतपणे उद्धव ठाकरे याबाबत काही बोलले नाहीत. पण आता गुवाहाटीत 45 आमदार जमलेला फोटो पाहिल्यानंतर दबावाखाली शिवसेनेच्या नेतृत्वाने ही भूमिका घेतली आहे का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसंच उलगडा होत नाही की महाविकास आघाडीतून बाहेर पडून शिवसेना किंवा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री भाजपसोबत जायला तयार आहेत का? भाजपसोबत जाऊन दुय्यम भूमिका घेणार का? हे स्पष्टीकरण नेतृत्वाकडून आलं तर बरं होईल”.
“कोण प्रतिक्रिया देतंय? कोण प्रवक्ता आहे? कोण अधिकृत आहेत हेच आपल्याला कळायला मार्ग नाही. काल उद्धव ठाकरे आपल्या वक्तव्यामध्ये असं काही बोलले नाहीत. पण मला वाटत नाही की उद्धव ठाकरे काही आमदारांच्या दबावामुळे सत्ता टिकवण्यासाठी किंवा सत्तेत राहण्यासाठी असा काही यूटर्न घेतील असं मला वाटत नाही. शेवटी हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांना भूमिका घेण्याचा अधिकार आहे. आम्ही त्यावर बोलू शकत नाही”, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –