‘एवढी प्रेमळ पत्नी असताना कोण डिप्रेशनमध्ये जाईल’ ; विराटच्या ‘त्या’ नैराश्यावर भारतीय दिग्गजाची प्रतिक्रिया

विराट अनुष्का

अहमदाबाद : कोरोना काळात सुरू झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंच्या मानसिक तसेच त्यांच्या आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कोरोनाकाळामध्ये संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडूंना बायो बबलमध्ये राहावे लागत आहे. त्यामुळे खेळाडू नैराश्यात जात असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, कोरोना काळातच नव्हे तर तर इतरवेळी देखील खेळाडूंना नैराश्याचा सामना करावा लागतो. याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने काही दिवसांपुर्वी  भाष्य केले होते. आता त्यावर माजी भारतीय दिग्गज फारुख इंजिनिअर यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

स्पोर्ट्सकीडाशी बोलताना ते म्हणाले की, “तुझ्याजवळ अनुष्का शर्मासारखी प्रेमळ पत्नी असताना तू अशा स्थितीत (डिप्रेशन) कसा जाऊ शकतोस. आता तर तू वडीलदेखील झाला आहेस. त्यामुळे ईश्वराला धन्यवाद म्हणण्यास तुझ्याकडे कारणही आहे. नैराश्य पश्चिमी देशांतील लोकांचा मुद्दा आहे. आपणा भारतीयांकडे खास शक्ती आहे. ज्यामुळे आपण नैराश्याचे शिकार होत नाही. एवढेच नाही तर, आपली मानसिक स्थिती खूप चांगली आणि मजबूत आहे. आपल्याकडे इतकी ताकद आहे की, आपण कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम आहोत. हेच इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये ती क्षमता नाही.”

भलेही माजी यष्टीरक्षक इंजिनिअर यांनी अनुष्काबद्दल भाष्य केले असेल, परंतु विराट नैराश्याचा शिकार असताना त्याचे लग्न झाले नव्हते. डिसेंबर २०१७ मध्ये विराट आणि अनुष्का हे लग्नबंधनात अडकले होते.

साल २०१४ मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौर्‍यावर असताना विराट सातत्याने अपयशी ठरला होता. या दौऱ्यातील पाच कसोटी सामन्यांतील दहा डावात त्याने अवघ्या १३.५० च्या सरासरीने १३४ धावा काढल्या होत्या. आश्चर्याची बाब म्हणजे, या संपूर्ण मालिकेत त्याला एकही अर्धशतक झळकवता आले नव्हते. यामुळे विराटला नैराश्य आले होते.

महत्त्वाच्या बातम्या