कोण होणार करमाळ्याचा आमदार?

narayan patil vs rashmi bagal

करमाळा/गौरव मोरे- करमाळा मतदारसंघाचा सध्या वर्तमानात वेगवेगळ्या प्रकाराचे राजकारण आणि कुरघोड्या होत असल्यातरी  आजपर्यंतचा इतिहास, आणि येणारे भविष्य जर पाहिले तर नक्कीच येथील राजकारण वेगळेच आहे, विधानसभेची निवडणूक आली की सर्व सोलापूर जिल्ह्याचे लक्ष करमाळा विधानसभा निवडणूकीवर लागलेले असते. आगामी विधानसभा निवडणूकीला जरी एक ते दीड वर्षे अवधी असला तरी, ही निवडणूक पारंपारिक पाटील-बागल-जगताप-शिंदे गटात  होणार हे जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळे कोण होणार करमाळ्याचा आमदार? अशा पारावरच्या गप्पांना वेग आलेला आहे.

त्या अगोदर आपण पाहूया 
करमाळ्याचा मागील इतिहास पाहिला तर राज्यात ज्या पक्षाचे सरकार येते त्यावेळी करमाळ्यातील जनतेने विरूद्ध कौल दिल्याचा इतिहास आहे १९७८ साली राज्यात जनता दलाची लाट त्यावेळी पाच उमेदवार होते. कॉंग्रेसचे नामदेवराव जगताप (३१५८७ मते) जनता दलाचे गिरधरदास देवी (२७१०१ मते) यांचा पराभव केला होता.

Loading...

१९८० साली राज्यात व देशात इंदिरा कॉंग्रेसची राज्यातील लाटेच्या विरूद्ध कॉंग्रेसचे नामदेवराव जगताप (२०००६ मते) यांना निवडून दिले. तर पुढे १९८५ साली कॉंग्रेसने एकत्र लढून त्यांचे सरकार राज्यात आले पण याच मतदारांनी कॉंग्रेसचे नामदेवराव जगताप यांना पराभूत केले. त्यावेळी अपक्ष उमेदवार रावसाहेब पाटील यांना(३४५०० मते) निवडून दिले. तर जगताप यांना (२३९५६ मते) पडली होती.

तसेच १९९० साली देशात जनता दलाची सत्ता होती. त्यावेळी जनता दलाकडून रावसाहेब  पाटील उभे होते त्यावेळचे पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांची  करमाळा येथे सभा होऊनही अपक्ष उमेदवार जयवंत जगताप (३५७६२ मते) यांनी जनता दलाचे उमेदवार रावसाहेब पाटील (२०६७० मते) यांचा पराभव केला होता.

त्यानंतर १९९५ साली राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले त्यावेळी अपक्ष उमेदवार कै. दिगंबरराव बागल (४५४२३ मते) यांनी कॉंग्रेसच्या जयवंत जगताप (४१४८५ मते) यांचा पराभव केला होता. तर युतीचे उमेदवार  तिसऱ्या स्थानी होते. १९९९ साली युती विरूद्ध कौल जाऊन राज्यात पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले. त्यावेळी सर्वजण वेगवेगळे लढले अपक्ष उमेदवार कै दिगंबरराव बागल (४३७८७ मते) यांनी कॉंग्रेसचे उमेदवार जयवंत जगताप (४३१०६ मते) आणि प्रथमच निवडणूक लढविणारे राष्ट्रवादीचे उमेदवार नारायण पाटील (१२५०७ मते) यांचा पराभव केला.

२००४ मध्ये राज्यात पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी ची सत्ता आली परंतु तालुक्यातील राजकारणात मात्र ट्विस्ट आला, कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढल्यामुळे करमाळ्याची जागा राष्ट्रवादीला गेली आणि राष्ट्रवादी कडून त्यावेळचे अपक्ष आमदार दिगंबरराव बागल यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळाले कॉंग्रेसची उमेदवारी न मिळाल्यामुळे माजी आमदार जयवंत जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळविली या निवडणूकीत १९९९ निवडणूक लढविलेले राष्ट्रवादीचे नारायण पाटील यांनी माघार घेतली आणि शिवसेनेचे उमेदवार जयवंत जगताप यांना पाठिंबा दिला. राज्यात पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी ची सत्ता आली आणि नेहमी प्रमाणे तालुक्यातील जनतेने सत्ता विरूद्ध कौल दिला शिवसेनेचे जयवंत जगताप (६२६९२ मते) यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार कै दिगंबरराव बागल (५९०५२ मते) यांचा पराभव केला.

३१ वर्षांचा इतिहास खंडीत

२००९ विधानसभा निवडणूकीत मतदारसंघ  पुर्नरचना झाली आणि करमाळा मतदारसंघाला माढा तालुक्यातील ३६ गावांचा समावेश करण्यात आला. माजी आमदार दिगंबरराव बागल यांचे २००६ साली  निधन झाले आणि त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी श्यामल बागल यांना राष्ट्रवादीची  उमेदवारी देण्यात आली. तर २००४ निवडणूकीत माघार घेतलेले राष्ट्रवादीचे नारायण पाटील यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून जनसुराज्य शक्ती पार्टी कडून निवडणूक लढविली तर त्यावेळचे शिवसेनेचे विद्यमान आमदार जयवंत जगताप यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून समाजवादी पार्टी कडून निवडणूक लढविली  या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार श्यामल बागल (७०९४३ मते) घेऊन जनसुराज्य चे नारायण पाटील (४३१२६ मते) आणि समाजवादीचे जयवंत जगताप (२५४११ मते) यांचा पराभव केला तर शिवसेनेचे उमेदवार सुर्यकांत पाटील यांनी केवळ (१३८१५ मते) पडली.

या निवडणूकीत प्रथमच ३१ वर्षांचा इतिहास पुसला गेला तालुक्यातील जनतेने  राज्यात ज्या पक्ष्याचे सरकार त्या उमेदवाराला कौल दिला.

२०१४ विधानसभा निवडणूक आली तेव्हा राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरोधी लाट होती. विधानसभा निवडणूकीच्या १ वर्षे अगोदर सध्याचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळविली.
राज्यात शिवसेना-भाजप यांची युती तुटली तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी ने आपली आघाडी तोडून स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाला.

आतापर्यंतचे इतिहास पाहिला तर तालुक्यात नेहमीच गटातटाचे राजकारण घडले पारंपारिक पाटील-बागल-जगताप गटात निवडणूका होत होत्या परंतु २०१४ विधानसभा निवडणूकीत सध्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी करमाळा विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला. शिवसेना कडून नारायण पाटील, राष्ट्रवादी कडून त्यावेळचे आमदार श्यामल बागल यांची कन्या रश्मी बागल तर कॉंग्रेस कडून जयवंत जगताप आणि भाजप महायुती पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे संजय शिंदे यांनी निवडणूक लढविली या निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार नारायण पाटील (६०६७४ मते) घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवार रश्मी बागल (६०४१७ मते) स्वाभिमानीचे संजय शिंदे (५८३०७ मते) आणि कॉंग्रेसचे जयवंत जगताप (१४३४८ मते) यांचा पराभव केला शिवसेनेचे नारायण पाटील हे २५८ मतांनी विजयी झाले. आणि २००९ विधानसभा प्रमाणेच तालुक्यातील जनतेने राज्यात ज्या पक्षांचे सरकार त्याच्या बाजूने कौल दिला.

२०१४ विधानसभा निवडणूकीत प्रथमच विधानसभा लढविणारे  संजय शिंदे यांना पडलेले मतदान हे सर्वांचे भुवया उंचविणारे होते. शिवसेनेचे नारायण पाटील पहिल्यांदाच विधानसभेत गेले.

सध्याचे तालुक्यातील वर्तमान

सध्यातरी वर्तमान पाहिले तर गेल्या चार वर्षात झालेल्या निवडणूका म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये आमदार नारायण पाटील यांची कामगिरी दमदार असल्याचे दिसून आले तर आदिनाथ आणि मकाई साखर कारखाना सोडले तर बागल गट मागिल चार वर्षात कफुटवर राहिला आहे. तर जि. प. अध्यक्ष संजय शिंदे यांच्या शिंदे गटाने तालुक्यातील सर्व निवडणूका लढवून यश मिळविलेले नसले तरी तालुक्यातील गावांगावात पोहोचण्यात त्यांना यश आले आहे. तर नुकत्याच झालेल्या करमाळा बाजार समिती निवडणूकीत जगताप-पाटील युतीला ८ जागा तर बागल गटाला ८ जागा मिळाल्या होत्या तर संजय शिंदे यांच्या गटाला दोन जागा मिळाल्या होत्या, चेअरमन पद निवडणूकीत  किंगमेकर असलेले शिंदे गट फक्त कागदावरच किंगमेकर राहिले, ऐनवेळी जगताप-पाटील गटाचे संचालक शिवाजीराव बंडगर यांनी बंडखोरी करून बागल गटात दाखल झाले त्यामुळे २९ वर्षांनंतर बाजार समितीवर सत्तांतर झाले आणि बागल गटाची सत्ता आली बंडखोर संचालक शिवाजीराव बंडगर यांना चेअरमन पदाची संधी मिळाली. तर दुसरी कडे गेल्या चार वर्षांत  ह्या चार गटांमध्ये चांगलीच रस्सीखेच पहायला मिळालेली आहे.

येणारे भविष्य

भविष्यात पहायला गेले तर आगामी विधानसभा निवडणूक याच चार उमेदवारांमध्ये होणार हे जवळजवळ निश्चित आहे.

शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी आमदार निधीतून  सध्या विकास कामांचा सपाटा लावला आहे रस्ते, पाणी,  वीज साठी भरघोस निधी तालुक्यात आणला आहे तर बहुचर्चित दहिगाव उपसा सिंचनाचे काम पूर्णात्वा कडे नेलेले आहे. तर जि. प.अध्यक्ष संजय शिंदे यांनी जि प  माध्यमातून निधी उपलब्ध करून देत आहेत. तर रश्मी बागल यांनी बागल गटाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविलेला असून आदिनाथ आणि मकाई कारखान्याच्या तसेच बाजार समितीच्या  माध्यमातून विकास काम करण्याचे सुरू आहे.

हा सर्व इतिहास-वर्तमान-भविष्य पाहिले तर येणारी विधानसभा निवडणूक नक्कीच चुरशीची होणार यात शंका नाही.

कोण होणार आमदार? यासाठी नेत्यांना डोहाळे लागले आहेत तर पारावरच्या गप्पांना वेग आलेला आहे.

करमाळ्यात पाटील-बागल-जगताप-शिंदे यांच्यातच लढत

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राजमुद्रेचा वापर केला तर कायदेशीर लढाई लढणार : विनोद पाटील