कौन बनेगा करोडपती मालिकेतून ‘बिग बी’ होणार रिटायर?

amitabh

मुंबई : जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या निर्मिती कंपनीला मोठा तोटा झाल्याने त्यांना मोठे नुकसान झाले होते. कंपनी अगदी दिवाळखोरीच्या वाटेवर आली असताना कौन बनेगा करोडपती हा टीव्ही गेम शो सुरु झाला. या शोने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला व अमिताभ बच्चन यांच्या कंपनीने राखेतून आकाशात उंच भरारी घेतली होती. तो कार्यक्रम आता अमिताभ बच्चन यांनी सोडला असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकताच कौन बनेगा करोडपती या सुपरहिट शो चा अखेरचा एपिसोड शूट केला. बिग बी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली.

बिग बी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये नमूद केले की, ‘मी आता थकलो आहे आणि रिटायर झालोय… मी तुमच्या सर्वांची माफी मागतोय…कौन बनेगा करोडपतीच्या चित्रिकरणाचा अखेरचा दिवस खूपच लांबला… कदाचित उद्या सुधारणा होईल…परंतु हे लक्षात ठेवा की काम तर काम असते आणि ते तन्मयतेने करायला हवे.’ बिग बी यांच्या या पोस्टवरून ते ‘कौन बनेगा करोडपती’च्या पुढील सिझनमध्ये दिसण्याची शक्यता कमीच आहे.

दरम्यान, अखेरच्या एपिसोडच्या चित्रिकरणाबाबतही त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये नमूद केले आहे. चित्रिकरणादरम्यान सर्वांच्या प्रेमळ वागण्याबद्दल बिग बी यांनी आभार मानले आहेत. तसेच या सर्व गोष्टी आपापसात कुठे ना कुठे तरी जोडलेल्या आहेत, असेही ते म्हणाले. तसेच कधी थांबायचे नाही, सतत चालत रहायचे हीच इच्छा आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. यावेळी सर्व टीमचे आभारही मानले.

महत्वाच्या बातम्या