राजकीय घडी पूर्णत: विस्कटलेल्या शिर्डी लोकसभेत कोण होणार खासदार ?

टीम महाराष्ट्र देशा : पूर्वाश्रमीचा कोपरगाव म्हणजेच आताचा शिर्डी लोकसभा मतदारसंघ. गेल्या पुनर्रचनेत हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाला. २००९ साली तत्कालीन सेवानिवृत्त अधिकारी भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेकडून ही निवडणूक लढवत भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांचा मोठय़ा फरकाने पराभव करून राज्याचे लक्ष वेधून घेतले. त्या अर्थाने ते जायंट किलर ठरले, मात्र २०१४ साली लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर शिवसेना सोडून ते काँग्रेसमध्ये गेल्याने शिवसेना व सर्वसामान्य मतदारांच्याही रोषाचे ते धनी बनले होते. त्यामुळे भाऊसाहेब वाघचौरे यांना लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता.

त्यामुळे अवघ्या 15 दिवसांच्या प्रचारात शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे हे सव्वा लाखांच्या मताधिक्क्याने निवडून आले. आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना, भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

शिवसेनेचे विद्यमान खासदार लोखंडे यांचा कमी असलेला जनसंपर्क पाहता शिवसेना लोखंडेंऐवजी बबनराव घोलप यांचे सुपुत्र आमदार योगेश घोलप यांच्या नावाचाही विचार करू शकते असं बोललं जातंय. पण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑक्टोबर 2019 मध्येच स्पष्ट केलंय, की सदाशिव लोखंडे हेच 2019 साठी उमेदवार असतील. शिवसेना स्वबळावर लढणार असल्याने भाजपला या मतदारसंघात उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.

सध्या भाजपात असलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचं नाव चर्चेत आहे. त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदार संघातून मात्र भारतीय जनता पार्टीकडून नितीन उदमलेंच्या उमेदवारीची देखील चर्चा जोर धरू लागली आहे. युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे असूनही भाजपाने नितीन उदमले यांचा आधीच प्रवेश करून त्यांना सक्रिय केले. प्रशासनाचा सक्रिय अनुभव व चर्मकार समाजातील अधिकारी या जमेच्या बाजू असलेला संघ विचाराचा प्रभाव असणारा एक तरुण कार्यकर्ता पक्षामध्ये सक्रिय करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी कडे केंद्रात व राज्यात सत्ता असूनही मागासवर्गीय समाजातून पुरेसे नेतृत्व पक्षाकडे नाही ही वस्तुस्थिती आहे. त्या दृष्टीकोनातून पुढची २० ते २५ वर्षे पक्ष कार्यात उपयोग होऊ शकेल अशा पद्धतीने उदमले यांना सक्रिय करण्यात येत आहे.

ग्रामविकास विभागात बी डी ओ आणि डेप्युटी सी इ ओ म्हणून काम केलेले असल्याने त्यांना ग्रामीण भागाची चांगली जाण आहे. गाव पातळीवरील समाजकारण आणि राजकारण यांची चांगली समज असल्याने ते पटकन लोकांमध्ये मिसळून जातात. त्याचबरोबर स्वतः बी एस्सी ऍग्री असल्यामुळे व शेती क्षेत्राची आवड असल्याने शेतकरी वर्गाशी त्यांचा थेट संवाद प्रस्थापित होतो. शेतीच्या समस्यांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन व समस्यांवर उपाय सुचविण्याची त्यांची क्षमता त्यांना भारतीय जनता पार्टी मध्ये एक वेगळे स्थान निर्माण करून देत आहे. शेतकरी नेत्यांबरोबर त्यांचे असणारे सलोख्याचे संबंध व संवाद यामुळे त्यांना पुढील काळात शेतकरी व सरकार मधील दुवा म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न होत आहे. शेतकरी वर्गाशी सरकारची नाळ जोडू शकणारा व प्रशासनाची उत्तम जाण असणारा तरुण नेता म्हणून नितीन उदमले यांच्याकडे पहिले जात आहे.

तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे यांना दक्षिणेतून (अहमदनगर लोकसभा मतदारसंघ) लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे. त्यामुळे दक्षिणेला काँग्रेस, तर उत्तरेत राष्ट्रवादी अशी आदलाबदल होण्याचीही चर्चा जोर धरु लागली होती. मतदारसंघात बदल झाल्यास आघाडीकडून रिपाईला सोडचिठ्ठी दिलेले अशोक गायकवाड, साहित्यिक उत्तम कांबळे आणि भारद्वाज पगारे, उत्कर्षा रुपवते, काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र आरक्षित शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी जागेची अदलाबदल करते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अगदी सुरुवातीला दिवंगत अण्णासाहेब शिंदे आणि नंतर दिवंगत बाळासाहेब विखे-पाटील अशा दोन दिग्गजांनी संसदेत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. शिंदे यांना प्रदीर्घ काळ केंद्रात मंत्रीपदाचीही संधी मिळाली. दिवंगत ज्येष्ठ नेते शंकरराव काळे यांनाही त्यांच्या कार्यक्षेत्रात या लोकसभा मतदारसंघानेच पहिल्यांदा स्वीकारलं. साखर कारखानदारी आणि सहकारी संस्थांच्या मजबूत पायावर काँग्रेसची पकड असलेल्या या मतदारसंघात अनपेक्षितरित्या भाजपने कधीकाळी या मतदारसंघात झेंडा रोवला. त्याला कारणीभूतही विखेच होते. राज्याच्या पातळीवर नेतृत्व करू शकतील अशा जिल्ह्यातील नेत्यांचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघाची आता राजकीय घडी पूर्णत: विस्कटली आहे.

कोण आहे भाजपचा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार ? पहा व्हिडीओ