fbpx

स्पेशल रिपोर्ट : कोण होणार राष्ट्रवादीचा नवा प्रदेशाध्यक्ष ?; पक्षात खांदे पालटाला सुरुवात

dilip valse patil, shashikant shindea and jayant patil

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे पडघम आत्ताच वाजायला सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकार विरोधात एल्गार करत राज्यभर हल्लाबोल आंदोलन केले. तसेच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये देखील नेतृत्व बदलाचे वारे वाहत आहेत. सध्या प्रदेशाध्यक्ष असणारे सुनील तटकरे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे ते आता राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होणार असल्याच बोलल जात आहे. तटकरे यांनी सलग दोन वेळेस प्रदेशाध्यक्षपद भूषवल्यानंतर आता पक्षाला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे.

सुनील तटकरे यांच्यावर सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपकडून आगामी निवडणुकांनामध्ये याचे भांडवल होणार हे निश्चित आहे, सिंचन घोटाळ्यामुळे निवडणुकांआधी तटकरे अडचणीत आले तर पक्षाची प्रतिमा मलीन होऊ शकते, याच भांडवल करत तटकरे यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी लॉबिंग केल्याचं बोलल जात आहे . त्यामुळे त्यांच्या ऐवजी दुसऱ्या नेत्याची प्रदेशाध्यक्ष वर्णी लगावी असा आग्रह धरण्यात आला.

जेष्ठ आणि अभ्यासू म्हणून ओळख असणारे जयंत पाटील याचं नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहे, तर कामगार नेते शशिकांत शिंदे हे देखील शर्यतीमध्ये कायम आहेत. जयंत पाटील हे खा. सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. राज्य सरकारला मार्मिक शब्दात उत्तर देणारे अशी जयंत पाटील यांची ओळख आहे.

शशिकांत शिंदे हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात माथाडी कामगारांचे नेते म्हणून शशिकांत शिंदे यांची ओळख आहे. दिलीप वळसे पाटील याचं नावही पुढे येत आहे.

दरम्यान, या निवडीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तूर्तास तरी स्पष्ट बोलत नाहीत. नवीन प्रदेशाध्यक्षाच्या निवडीस अवघे दोन दिवस उरले असताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच नाव अचानक चर्चेत आले आहे. मात्र या सगळ्या चर्चा फेटाळत, मी पक्षाच्या ज्या वर्तुळात आहे त्यामध्ये अशा काही चर्चा झाल्याच नसल्याचा निर्वाळा’ त्यांनी दिला आहे.

सुनील तटकरे यांणा २०१४ साली प्रदेशाध्यक्ष बनवलं गेल होत, त्यानंतर आणखी दोन वर्ष त्यांना वाढवून देण्यात आली होती. आता राष्ट्रीय सरचिटणीस बनवल्यानंतर त्यांना रायगड लोकसभा मतदार संघात उमेदवारी देण्यात येणार असल्याच बोलल जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजप शिवसेनेच्या सरकार विरोधात हल्लाबोल करत चांगलच रान पेटवत आहे. मात्र, आता पक्षात सुद्धा प्रदेशाध्यक्ष निवडीवरून चांगलच वातावरण तापल आहे. नवीन पक्ष कार्यकारणी निवडीवर शरद पवार याचं वर्चस्व असणार की अजित पवार याच, याकडे सगळ्यांच लक्ष लागल आहे.

राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार यावर राज्यातील पक्षाचे नेतृत्व कोण करणार हे ठरणार आहे. शेवटी अजित पवार समर्थक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाले नाही, तर सुप्रिया सुळे राज्यात पक्षाचे नेतृत्व स्वीकारणार का ? हा खरा प्रश्न आहे.