आपल्या प्रियजनांच्या सुरक्षिततेसाठी प्रदेशातून आलेल्या नागरिकांनी स्वतःहून प्रशासनापुढे या : पुणे महापालिका

pune mahapalika125

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात दिवसेंदिवस कोरोना विषाणू संसर्गाचा विळखा घट्ट होत चालला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन देशात लॉकडाऊन केले आहे. मात्र त्या नंतरही नवनवीन शहरांत आणि ग्रामीण भागांतही कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना हा विषाणू परदेशातून भारतात पसरला आहे. चीन, इटली, अमेरिका या देशांमध्ये कोरोनाचा धुमाकूळ सुरू असतानाच, भारतातही आता त्याने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. केरळनंतर कोरोनाचे सर्वाधिक महाराष्ट्रात आढळले आहेत.

या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एक मार्च व त्यानंतर परदेशातून परत आलेल्या नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन प्रशासनास माहिती देणे अनिवार्य करण्यात आले आहे. नाव नोंदणी करणे अत्यावश्यक असून idsp.mkcl.org या संकेतस्थळावर जाऊन त्वरीत माहिती द्यावी, असे आवाहन पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे. ” कोरोना हा आजार संसर्गातून होतो. त्यामुळे या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनाही संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासन सध्या अशा व्यक्तींचा मागोवा, नंतर त्यांची तपासणी आणि उपचार म्हणजेच शोध, तपासणी आणि उपचार या त्रिसूत्रीप्रमाणे काम करत आहे. त्या अनुषंगाने पुणे महानगर पालिकेकडून 1 मार्चनंतर परदेशातून भारतात आलेल्या नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे, परदेशातून मायदेशी परतलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी केंद्र, राज्य सरकार, महापालिका, पोलिस व जिल्हा प्रशासन संयुक्तपणे काम करत आहे. मात्र या कामासाठी मनुष्यबळाअभावी यंत्रणेस त्यात वेळ लागू शकतो. त्यामुळे, “प्रशासनाने माग काढून आपल्या घरापर्यंत येण्याची वाट न पाहता, परदेशातून परतलेल्या नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन वरील लिंकवर प्राधान्याने माहिती द्यावी. आपल्या प्रियजनांच्या, संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे,” असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त व पुणे स्मार्ट सिटीच्या सीईओ श्रीमती रुबल अग्रवाल यांनी केले आहे.