वॉटर ऑडीटमधील ३० एमएलडी पाणी कुणी पळवले? शहराला १५० पैकी १२० एमएलडीचा पुरवठा

औरंगाबाद : शहरासाठी जायकवाडीच्या पाणी पुरवठा योजनेतून मिळणाऱ्या पाण्याचे ऑडिट पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शहराला १५० एमएलडी पाणी पुरवठा होत असून त्यापैकी १२० एमएलडी पाणी मिळत असल्याचे ऑडीट अहवालमध्ये नमूद केले आहे. मात्र ३० एमएलडी पाणी कुठे जाते? हे पाणी कुणी पळवले? पाण्याचे लॉसेस कशा स्वरूपाचे आहेत याबद्दल मात्र ऑडीटमध्ये सांगण्यात आलेले नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.

सध्या अस्तीत्वात असलेल्या पाणी पुरवठा योजनेसाठीच्या ७०० आणि १२०० मिली मीटर व्यासाच्या जलवाहिन्यांची क्षमता संपल्यामुळे या जलवाहिन्यांमधून जास्तीचे पाणी वाहून आणणे शक्य होत नाही. पाण्याचा थोडाजरी दाब वाढला तरी या जलवाहिन्या फुटतात त्यामुळे शहरात पाणीबाणी निर्माण होते. शहरातील पाणीबाणीवर तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी वीस एमएलडी पाणी वाढविण्याचे आदेश मनपा व एमजेपी प्रशासनाला दिले. या आदेशाच्या पाश्र्वभूमीवर मनपाचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी महापालिकेच्या अधिका-यांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिका-यांची बैठक घेतली.

या बैठकीत पाणी पुरवठा योजनेतून मिळणाऱ्या पाण्याचे वॉटर ऑडीट करण्याचे आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिले होते. या आदेशानुसार दीड महिन्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने वॉटर ऑडिट केले असून त्याचा अहवाल मनपा प्रशासकांकडे सादर केला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जायकवाडी पंपगृहातून उपसा होणाऱ्या १५० एमएलडी पाण्याचे वॉटर ऑडीट करण्यात आले. दिडशे एमएलडी पैकी शहराला १२० एमएलडी पाणी मिळते. ३० एमएलडी पाणी कुठे जाते? या पाण्याची चोरी होते का? हे पाणी कुणी पळवले? पाण्याचे लॉसेस कशा स्वरूपाचे आहेत. याबद्दलची कोणतीही माहिती ऑडीट अहवालमध्ये नमूद करण्यात आलेली नाही. वॉटर ऑडीट मधील पाण्याच्या आकडेवारीवर अजूनतरी मनपा प्रशासकांच्या उपस्थितीत चर्चा झालेली नाही.

दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केवळ मनपाकडील आकडेवारीच्या आधारावरच हे वॉटर ऑडीट करण्यात आले. वास्तविक परिस्थिती मात्र वेगळीच आहे. दोन्ही योजना जिर्ण झाल्या असून त्यांची पाणी वहन क्षमता अत्यंत कमी झालेली आहे. अशा परिस्थितीत एमजेपीने जलवाहिनीवर मिटर लावून पाण्याची मोजदाद करणे अपेक्षित होते. त्यानंतर शहराला मिळणारे पाणी, गळती होणारे पाणी याचीही मोजदाद होणे गरजेचे होते असेही सुत्रांनी सांगितले.

दरम्यान, दररोज ३० एमएलडी पाण्याचे लॉसेस होतात. हे नुकसान मोठे असून हे पाणी कुठे वाया जाते हे अद्याप ऑडीट अहवालामध्ये स्पष्ट झालेले नाही. एक एमएलडी म्हणजे दहा लाख लिटर या प्रमाणे हिशोब केलातर ३ कोटी लिटर पाणी वाया जाते. तीन कोटी लिटर पाण्याची चोरी होणे शक्य नाही. परंतु या पाण्याचा व्यवस्थितपणे हिशोब मांडण्यात आलेला नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या