सचिन वाझेचा म्होरक्या कोण ? जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल

jayant patil

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेला १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने देखील लेटरबॉम्ब टाकत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी खळबळ उडवून दिली आहे.

एनआयए कोर्टासमोर वाझेचे हस्तलिखित पत्र सादर केलं आहे. या पत्रात सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील खंडणी मागण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे. SBUT वरील चौकशी थांबवण्यासाठी व बृहन्मुंबई महापालिकेच्या काही ठेकेदारांकडून पैसे वसूल करण्यास सांगितल्याचे सचिन वाझे याने आपल्या पत्रात नमूद केलं आहे. त्यामुळे आता अनिल परब यांच्या देखील राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, सचिन वाझे याच्या या खळबळजनक पत्रानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी टीकास्त्र सोडलं असून भाजपलाच लक्ष्य केलं आहे. मूळ प्रकरण हे मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटकाने भरलेली गाडी कोणी ठेवली याच्या तपासाचं होतं. तर, दुसरं, मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचं होतं. मात्र हे आता तिसरीकडेच चाललं आहे. त्यातही जो आरोपी आहे त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

जर सचिन वाझेवर कोणत्या मंत्र्यांचा दबाव होता, जे त्यांनी आरोप केले आहेत तसं काही कृत्य करायला सांगितलं होतं. तर त्यांनी तेव्हाच का तक्रार दाखल केली नाही. त्यांना अटक झाली तेव्हा देखील ते सुरुवातीला काही बोलले नाहीत. मात्र, आता इतक्या दिवसांनी ते गंभीर आरोप करत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा हा डाव आहे. भाजपा बोलतेय तशीच चौकशी एनआयएकडून होत आहे. त्यामुळे सचिन वाझेचा म्होरक्या कोण ? याचा देखील तपास झाला पाहिजे, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :