fbpx

हजारो बालकांच्या मृत्यूला जबाबदार कोण?- धनंजय मुंडे

मुंबई  – जोपर्यंत अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा सरकार रद्द करत नाही तोपर्यंत सभागृह आम्ही चालू देणार नाही असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात दिला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि विरोधी आमदार सभागृहामध्ये आक्रमक झाल्यामुळे सभापतींना सभागृहाचे कामकाज चार वेळा तहकुब करावे लागले आणि त्यानंतरही आमदार आक्रमक राहिल्यामुळे विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकुब करावे लागले.

संपकाळात १२५ बालकांचा मृत्यू झाला म्हणून अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावणार असाल तर १४ जुलै २०१७ मध्ये मृत्यू झालेल्या १४४८ आणि ऑगस्ट २०१७ मध्ये मृत्यू झालेल्या १२०० बालकांच्या मृत्यूला जबाबदार कोण ? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला. सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना द्या आणि नंतर मेस्मा लावा अशी मागणी त्यांनी केली.

मेस्मा ही सरकारची जबरदस्ती आहे. ज्यांच्यामुळे या राज्यात कुपोषण कमी झाले त्या अंगणवाडी सेविकांना आंदोलन करावे लागते ही मोठी शोकांतिका आहे. २१ दिवस आंदोलन सुरू असल्यानंतर त्यांच्या मागण्या मान्य करून का घेतल्या नाहीत? खाजगी कंत्राटदारांचे पैसे आणि त्यांचे बिले तात्काळ देता,मग अंगणवाडी सेविकांची बिले सहा महिन्यांपासून का रखडवली जातात असाही सवाल मुंडे यांनी केला.

अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेल्या मेस्मामुळे विधानपरिषदेमध्ये जोरदार हंगामा झाला. विरोधकांनी अंगणवाडी सेविकांवर लावलेला मेस्मा रद्द करण्याची जोरदार मागणी लावून धरली. यामध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांसह आमदार कपिल पाटील,आमदार शरद रणपिसे, आमदार भाई जगताप,आमदार अनिल परब यांनी सभागृह दणाणून सोडले. त्यामुळे सभापतींनी दिवसभरासाठी कामकाज तहकुब केले.