fbpx

कोणतेही पवार माझ्या विरोधात असले तरी मीच खासदार होणार

पिंपरी : कोण पार्थ पवार? ‘राष्ट्रवादी’चे नेते अजित पवार यांचा पुत्र, ही त्यांची ओळख आहे. कोणतेही पवार माझ्या विरोधात लढण्यास आले, तरी मला फरक पडणार नाही. मीच खासदार होणार. मला ओळख निर्माण करण्यासाठी बॅनरबाजी करण्याची आवश्यकता नाही. अशी टीका मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली केली आहे.

गेल्या दोन लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून निवडून आलेले खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरुद्ध अजित पवार यांनी मुलगा पार्थ पवार याला मावळ मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची खेळी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या काही दिवसांपासून अजित पवार स्वत: पार्थसोबत मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघ आघाडीमध्ये ‘राष्ट्रवादी’च्या वाट्याला आला आहे. सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार माजी महापौर आझम पानसरे व राहुल नार्वेकर यांचा पराभव झाला आहे. मावळ मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘राष्ट्रवादी’ची ताकत असूनही अंतर्गत गटबाजीचा फटका पक्षाच्या उमेदवाराला बसत आहे. त्यामुळे अजित पवार यांनी मुलगा पार्थ पवार याला मावळ मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची खेळी सुरू केली आहे.

लोकसभा निवडणुकी बाबतीत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पत्रकार परिषदेत बारणे यांना विचारणा करण्यात आली. यावेळी बारणे म्हणाले, कोण पार्थ पवार? ‘राष्ट्रवादी’चे नेते अजित पवार यांचा पुत्र, ही त्यांची ओळख आहे. कोणतेही पवार माझ्या विरोधात लढण्यास आले, तरी मला फरक पडणार नाही . मला ओळख निर्माण करण्यासाठी बॅनरबाजी करण्याची आवश्यकता नाही. पवार घराण्याने महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी वाटून घेतले आहेत. लोकसभा शिरूरच्या जागेवर अजित पवार, बारामतीमध्ये सुप्रिया सुळे, मावळमध्ये पार्थ पवार आणि पुणे मतदारसंघातही त्यांच्या घराण्यातील कोणीतरी पवार इच्छुक आहे. परंतु, मला काही फरक पडत नाही.