रिक्षा चालक ते रिअल इस्टेट किंग…अविनाश भोसले यांचा थक्क करणारा प्रवास

avinash bhosale

पुणे : अनेक बड्या राजकीय पुढाऱ्यांसोबत निकटचे संबंध असलेल्या आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे असलेल्या बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. आज ईडीने अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांची तब्बल ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त केली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची याआधी दोन वेळा चौकशी करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात ईडीने अविनाश भोसले यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना ईडी कार्यालयात बोलावून घेतले होते. यावेळी त्यांची दहा तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले होते. याचदरम्यान पुणे आणि मुंबईतील २३ ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या.

अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे असून ते एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्या शब्दाला वजन असल्याची चर्चा असते. भोसले यांचा पुण्यात आणि मुंबईत बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. तसेच देशभर त्यांची कंपनी पायाभूत क्षेत्रात काम करते.

अविनाश भोसले यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील तांबवे हे आहे. वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं ते अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरला गेले. पुढे संगमनेर शहरातून अविनाश भोसले पुण्यात आले. त्यांनी रिक्षाचालक म्हणून सुरुवात केली. पुण्यातील रास्ता पेठ भागात भाड्याच्या घरात राहून अविनाश भोसले यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केला. अल्पावधीत रिक्षा भाड्याने देण्याचा व्यवसाय ते करु लागले.

पुढे अविनाश भोसले यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून काम करणाऱ्यांशी झाली. यानंतर अविनाश भोसले यांनी रस्ते तयार करण्याची लहान-मोठी कंत्राटं घेतली.अविनाश भोसले यांना शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये (1995) कृष्णा खोरे विकास महामंडळाची कामं मिळाली. याच माध्यमातून त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी कालवे, धरणं बांधली.

पुण्यातील बाणेर भागात अविनाश भोसले यांनी उभारलेला व्हाईट हाऊस हा बंगला डोळे दिपवणार आहे. हाऊसच्या टेरेसवर अविनाश भोसलेंच्या मालकीचे हेलिकॉप्टरही आहेत. रिक्षा व्यवसाय ते स्वतःच्या मालकीची हेलिकॉप्टर इथपर्यंतचा प्रवास अवघ्या काही वर्षांचा आहे. अविनाश भोसले यांचा हा प्रवास सर्वांच्याचं दृष्टीनं अचंबित करणारा आहे.

महत्वाच्या बातम्या