“विश्वप्रवक्ते संजय राऊतांना ‘हा’ अधिकार कोणी दिला” ; चंद्रकांत पाटलांचा टोला

मुंबई :  राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेवरुन राज्यात सुरु असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेनेने आपला अधिकृत उमेदवार जाहीर केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती. पण यावरून अजूनही राजकीय आरोप प्रत्यारोप होतंच आहेत. शिवसेनेवर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी चंद्रकांत दादांना यात चोंबडेपणा करु नये, असं म्हटलं आहे. यावर आता चंद्रकांत पाटलांनी पलटवार केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले आहे. शिवसेने आणि संजय राऊत यांच्यावर ट्विट करत त्यांनी टीका केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, “मी शिवाजी महाराजांचा वंशज नाही, हे सामान्यज्ञान आहे. पण हिंदुत्वविरोध्यांसोबत चाललेल्यांना शिवरायांची मक्तेदारी कुणी दिली? तुम्ही शब्दांचे पक्के आणि बाकीचे सगळेच खोटारडे, यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल? आणि हो… सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार विश्वप्रवक्त्यांना कुणी दिला?” अशा शब्दांत चंद्रकात पाटील यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

राज्यसभा निवडणुकीतून आपण माघार घेत आहोत असं संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषेदेत जाहीर केले होते. संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आपल्याला दिलेला शब्द मोडल्याचा गंभीर आरोप केला होता. “मुख्यमंत्र्यांना शिवरायांच्या पुतळ्यासमोर उभं करून खरंखोटं करावं,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

“चंद्रकांत दादा कोण? ते शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का? २०१९ साली शब्द कोणी मोडला ते आधी त्यांनी सांगाव? शब्द मोडण्याची परंपरा कोणाची आहे, हे २०१९ ला सर्वांनी पाहिलंय. हा विषय छत्रपती संभाजी आणि शिवसेनेतील आहे, इतरांनी मध्ये चोंबडेपणा करू नये, आमचं आम्ही बघून घेऊ” असं संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना सुनावलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या :