देशात घातपाताचा कट रचण्याचा आरोप असणारा जान मोहम्मद शेख नेमका आहे तरी कोण?

जान मोहम्मद शेख

मुंबई – आगामी नवरात्रोत्सवादरम्यान महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 2 पाकिस्तानी नागरिकांसह एकंदर सहा दहशतवाद्यांना यांसदर्भात अटक केली. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेचे आयुक्त नीरज ठाकूर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यातील एक आरोपी महाराष्ट्रातील आहे असं समोर आले आहे.

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या साथीदारांना हाताशी धरून ‘आयएसआय’ने दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतील शहरांमध्ये सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट आखला होता, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यासाठी, मॉड्यूलच्या वेगवेगळ्या संशयितांना आणि त्यांच्या नेटवर्कशी संबंधित लोकांना वेगवेगळी कामे दिली गेली. या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हा खुलासा केला.

जान महंमद शेख (४७, महाराष्ट्र), ओसामा ऊर्फ सामी (२२, जामियानगर), मूलचंद ऊर्फ साजू (४७, रायबरेली), झिशान कमर (२८, अलाहाबाद), महंमद अबू बकर (२३, बहराइच), महंमद अमीर जावेद (३१, लखनऊ) या सहा जणांना अटक करण्यात आल्याचे दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त नीरज ठाकूर यांनी सांगितले. हे दहशतवादी सणांच्या काळात मोठा हल्ल्या करण्याच्या प्रयत्नात होते. या दहशतवाद्यांना अल कायदा, आयएसआयएस यासारख्या दहशतवादी संघटनांसह अंडरवर्ल्डची त्यांना साथ होती. अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस हा फंडिंग करत होता. आयएसआयएस त्यांना शस्त्रास्त्र देत होती. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने त्यांना प्रशिक्षण दिलं होतं. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर स्फोटकं आणि शस्त्रास्त्रं जप्त करण्यात आली आहेत.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांमध्ये मुंबईच्या जान मोहम्मद शेखचाही समावेश आहे. मुंबई क्राईम ब्रांचची टीम त्याच्या सायनमधील घरी पोहोचली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवण्यात आला. समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, जान महोम्मद शेख आणि त्याच्या साथीदारांना दाऊद इब्राहिमकडून रसद पुरवली जात होती. त्यामुळे जान महोम्मदचे आणखी कुणी साथीदार आहेत का? त्यांचा नेमका मनसुबा काय आहे? याचा छडा लावण्याचं तपास यंत्रणेसमोर आव्हान आहे.

जान मोहम्मद शेख सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या काला बखर परिसरात वास्तव्यास होता. सायन येथील तो फार जुना रहिवाशी आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि दोन मुली असे चौघेजण या घरात राहत होते. तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता अशी माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या